वाशिम : आपले संपूर्ण आयुष्य गोरक्षणाकरीता खर्ची घालणारे, तिर्थक्षेत्र पोहरादेवी सह अनेक मंदिर संस्थानावरील बोकूड बळी प्रथा कायमस्वरूपी बंद करणारे, अंधश्रद्धा,दुर्व्यसन,हुंडा कुप्रथा निर्मूलन करणारे,अहिंसेचे पुजारी तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते शासनाच्या राष्ट्रिय पुरस्काराने गौरवांकित असलेले, मंगरुळपिर तालुक्यातील आदर्श समाजसेवक तथा आधुनिक संत दिलीपबाबा हे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची वार्ता ऐकून कारंजा (लाड) येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे ,माजी सरपंच तथा समाजसेवक प्रदिप वानखडे, साप्ताहिक करंज महात्म्य वृत्तपत्राचे ग्रामिण प्रतिनिधी गोलू पाटील लाहे आदी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच लाठी येथील, श्री दिलीप बाबा गोरक्षण जीवदया व्यसनमुक्ती संस्था लाठी (शेलू बाजार) ता. मंगरुळपिर जि. वाशिम येथे भेट दिली. व आदर्श समाजसेवक तथा आधुनिक संत दिलीप बाबा यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. दिलीप बाबा हे सध्या गंभीर आजारी आहेत. परंतु असे असतांनाही आज रोजी ते निःस्वार्थपणे दोनशे गायी वासरांचे पालन पोषण करीत असून, त्यांनी गायी वासरांच्या चाऱ्या करीता चाळीस एक्कर शेतीमध्ये गवत पेरले आहे. त्यांचा जीवन गौरव म्हणून शासनाने त्यांना व्यसन मुक्ती पुरस्कार,दलितमित्र पुरस्कार, शेतीनिष्ठ पुरस्कार आदीवासी पुरस्कार इत्यादी पुरस्काराने गौरविलेले असून त्यांचे जीवनकार्य पहाता ते चालते बोलते विद्यापिठ असल्याचे दिसत असून त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने गोपालन गोरक्षण योजना सुरु करावी असा मनोदय विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, प्रदिप वानखडे यांनी व्यक्त केला आहे.