अकोला/वाशिम : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस मध्ये विविध सामाजिक घटक यांना सवलत दिल्या जातात,ज्यामधे राखीव आसने उपलब्ध करून दिलेली आहेत. ज्यामध्ये महिला मंडळी, दिव्यांग, खासदार आमदार ,स्वातंत्र्य सैनिक यांना व अधिस्वीकृति धारक पत्रकारांसाठी बसमधील आसन आरक्षित करण्यात आलेली आहेत. परंतु,महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणारे राज्य स्तरीय पुरस्कार जसे राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसन मुक्ति सेवा पुरस्कार,डॉ बाबासाहेब आम्बेडकर समाजभूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार,संत रविदास पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, शेतकरी पुरस्कार वगैरे. तसेच विशेष म्हणजे या पुरस्कारार्थीना व त्यांचे एका सहकार्याला १००% मोफत प्रवास सवलतही दिल्या जात असते.मात्र एस.टी.बसमध्ये पुरस्कारार्थी यांना कुठेही राखीव आसन ठेवण्यात आलेली नाही.त्यामुळे या विषयावर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरिय पुरस्कारार्थी संघटनेचे अकोला येथील संस्थापक प्रदेशाध्यक्ष अशोक रामटेके यांनी मुख्यमत्री-उपमुख्यमंत्री-राज्य परिवहन मंत्री यांना विनम्र निवेदन देऊन राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक प्रकारच्या बसमध्ये किमान दोन आसने महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी यांचेकरीता राखीव ठेवण्याची लेखी मागणी केली असून त्यांच्या या मागणीला वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी पाठींबा दिला आहे.या संदर्भात अकोला येथील पत्रकारांशी बोलतांना,संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष अशोक रामटेके म्हणाले, "आमची अशी कोणती चूक आहे की,राज्य महामंडळाने सवलती तर दिल्या परंतु राखीव आसनापासून आम्हाला डावलण्यात आले आहे ? आज महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी यांना विविध राष्ट्रीय कार्यक्रम जनजागृती आणि सामाजिक कार्यक्रम करण्याकरीता जावे लागते. जवळपास सर्वच पुरस्कारार्थी वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरीक असतात.परंतु तरीही आसन राखीव नसल्यामुळे आम्हाला सतत दिवस दिवसभर उभे राहून धक्के खात प्रवास करावा लागतो.त्यामुळे शासनाने निदान आमचे वयाचा आणि सन्मानाचा विचार करून आमचेकरीता बसमधील आसन राखीव करावे." तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कारार्थी यांचा स्पष्ट उल्लेख बस स्थानकावरील फलकावर करावा.अशी मागणी त्यांनी केली आहे.