लोकसहभाग म्हणजे औपचारिक किंवा अनौपचारिक माध्यमांद्वारे एखाद्या निर्णयामुळे प्रभावित किंवा स्वारस्य असलेल्यांच्या सहभागाबद्दल. लोकसहभागाचा हेतू सहभागींना कारवाई करण्यास सक्षम करणे आणि निर्णय प्रक्रियेत ऐकले जाणे आणि परिणामी, अंतिम निकालावर परिणाम करणे हा आहे.*
*स* रकारी शाळा म्हटल की शहरी भागातील पालकांच्या अंगावर काटा येतो. हे वाचताना जरी नवल वाटत असेल ,पण आज तरी हे गुणोत्तर मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे......त्यामागील बरीच कारणं असू शकतात.सांगायचं झालं तर त्याचा मुलगा त्या इंग्रजी माध्यमात शिकतोय माझा का सरकारी मध्ये जाईल....तो चांगला इंग्रजी बोलतो मग मी पण त्याच शाळेत टाकतोय....अंगावरील कपडे ,शूज टापटीपपणा ,सांगताना अभिमान माझा मुलगा इंग्रजीच्या मोठ्या शाळेत शिकतोय, मुलांच्या भविष्याची भीती......असे बरीच कारण आहे ज्यामुळे मुलं सरकारी शाळेला पसंती देत नाही. पण एक विचार केला का?आपण आज एका मोठ्या पदावर कार्यरत आहे तर माझं शिक्षण कुठून झालं......मी घडलो नाही का? पण आपण बाहेरील जगातील चमक दमक याला भुरळ पडतं आहो. आपण माना अथवा नका मानू पण हे खूप मोठ्या प्रमाणावर सत्य आहे.
जर खाजगी शाळा व सरकारी शाळा यांचा विषयानुसार ताळेबंद बघितला तर मराठी ,इंग्रजी व गणित यातील अपेक्षित क्षमता मध्ये सरकारी शाळेचा टक्का हा त्यापेक्षा सरस आहे. तरी देखील पालक आजही या सरकारी शाळेकडे नाक मुरडतात.
*लो* कसहभाग याविषयी आज पालकांनी जागरूक असणे फार गरजेचे आहे.आज ज्या काही मोजक्या शाळा प्रसिद्धीच्या झोक्यात दिसतात त्या असेल तर त्यामागचे खरे रहस्य म्हणजे लोकसहभाग हाच होय.मी याविषयावर बोलू शकतोय कारण आज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह या शाळेचा सुरुवातीचा प्रवास हा प्राथमिक शाळा इयत्ता 1 ली ते 4 थी पटसंख्या 22 वरून झाला. आज या शाळेत इयत्ता 1 ली ते इयत्ता 4थी असलेली शाळा आज ती इयत्ता 10 वी पर्यंत झाली. ते शक्य झालं असेल तर गावातील लोकांचा सहभाग यामुळेच ....आज या शाळेचा पट सुध्दा वाढला आहे.इतकेच काय या शाळेत बाहेर जिल्ह्यातून या शाळेत शिकायला येतात. आज 30 ते 35 किमी अंतरावरुन या शाळेत शिकण्यासाठी मुल महाराष्ट्र शासन बस ने ये-जा करतात.
जिल्हा परिषद शाळा वाचवणे आज गरज आहे,ते शक्य होईल ग्रामीण भागातील लोकसहभाग व शिक्षक सहभाग यानेच.....आज एक-एक करत शाळा बंद झाल्या तर ग्रामीण भागतील मुलांच्या शिक्षणाचे काय? त्यापूर्वीच पालकांनी जागरूक होणे फार गरजेचे आहे.
पालकांना माहीतच असेल जेव्हा "जियो सिम" आले त्यावेळी लोकांची सिम विकत घेण्यासाठी झुंबल उडाली होती, कारण कॉलिंग , डेटा फ्री होता.पण आज आपल्याला त्याच सिम करिता रिचार्ज करायला पैसे द्यावे लागते. तसेच आज सरकारी शाळेचं खाजगीकरण झाले तर उदयाला आपल्याला फ्री मिळणार शिक्षण विकत घ्यावे लागेल. जी ग्रामीण भागतील मुले आज सरकारी नोकरी करत आहे त्यांना भविष्यात मात्र सरकारी नोकरी शिल्लक राहणार नाही.
लोकसहभाग म्हणजे काय ? बऱ्याच वाचकांना प्रश्न पडला असेल हो न.....मित्रानो फक्त पैसा म्हणजे लोकसहभाग नाही .
"आपल्याला जे जमत जे झेपत तितकेच श्रमदान किंवा देणगी.मग ती वस्तू स्वरूपात देणगी वा रोख स्वरूपात देणगी." अस म्हणता येईल.
मित्रानो आपल्या शाळा स्मार्ट , डिजिटल करायच्या असल्यास त्या शासनाच्या निधी वर होणार नाही. त्याकरिता आपल्याला समोर यावे लागेल .खाजगी शाळेत मोठी रक्कम देऊन मुलांना शिक्षण देण्यापेक्षा थोडा आपल्या मुलांसाठी वाटा म्हणून शाळा सुधार फंडाला बळकटी दिली तर काय हरकत आहे.....सोबतच सरकारी शाळा ही आपल्या हक्काची शाळा आहे जिथे आपण जाऊन कधीही जाब विचारू शकतोय. पण हेच आपण खाजगी शाळेत गेलो तर अपराधी प्रमाणे रांगेत उभे राहावे लागते ते सांगेल ते एकूण गप्प बसावे लागते.हा जवळपास सर्वांचा अनुभव असावा .
माझे या शाळेशी १८ वर्षाचे ऋणानुबंध आहे. जी शाळा डोंगरउतारावर वसलेली.जिथे साधं कबड्डी सुध्दा न खेळता यावे इतकेसे मैदान ....दोन वर्ग खोल्या शाळेत २२पट .गावाची आर्थिक परिस्थिती जोमतेम.....शिक्षणाचा कसलाही गंध नाही..या परिस्थितीत शाळेला समोर नेण्याची जिद्द ......गावात शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठी स्वतः हातात कुदळ,खोर घेऊन श्रमदान करून सण २०१२ ला सुरुवात केली.त्यावेळी गावाचा सहभाग नव्हताच,तब्बल ६ वर्ष तो डोंगर पोखरून शाळेला मैदान तयार केले. हीच ती सुरुवात .....नी आजही त्याच जोश व जिद्दीने काम चालू.....कामात सातत्य व जिद्द असेल तर अशक्य ते काहीच नाही.....
श्रमदानातून एक पाऊल समोर टाकल्याने आज या गावात जी शाळा उभी आहे ती लोकसहभागातून म्हटल्यास वावगे ठरणार नाही ......आज या शाळेची भव्यदिव्य इमारत उभी असेल तर लोकसहभागातून घेतलेल्या जमिनीवरच . ही शाळा ४ थी पर्यंत होती टी आता ती ८ वी झाली शाळा बांधायला जागा नाही करायचं काय? हा मला पडलेला प्रश्न ..त्यात गावातील लोकांचा पुढाकार ,गावातील प्रतिष्ठित,बुजुर्ग लोकांनी समोर येऊन " गुरुजी " काळजी नका करू! जागेच काय ते आम्ही बघू ,नक्का काळजी करू...अस म्हणत लोकांनी शाळेला लागलेली शेतजमीन लोकसहभागातून विकत घेत शाळेला दान दिली. ही जमीन खरेदी करताना रक्कम कमी पडू लागली तेव्हा गावातील "हनुमानाचे मंदिर" त्या मंदिरातील दानपेटीत असलेले ४०,००० हजार रुपये त्यांनी शेतजमीन खरेदीला दिले. आज या शाळेला दरवर्षी मोठ्याप्रमाणात लोकसहभाग येत असतो. आज या शाळेला संगणक,बाला पेंटिंग,मुलांना खेण्यासाठी साहित्य,वाचनालयासाठी पुस्तक,साऊंड,शाळा सुधार फंडात रोख रक्कम, सबमर्शिबल,वृक्ष, तर शालेय व्यवस्थापन समितीकडून गरजेनुसार रक्कम, गावातील लोकांचे श्रमदान,शाळेतील मुलांना पोशाख तर शाळेत अध्यापन करण्यासाठी अपुरे शिक्षक त्यांना मानधन म्हणून दरमहिण्याला ६००० रुपये अनुदान शाळा सुधार फंडात जमा ,अशा पद्धतीने आज या शाळेला लोकसहभाग मिळत आहे.
*"शाळा जगवायची-फुलवायची असेल, भविष्यात आपल्या मुलांना सरकारी नोकरी मिळावी असे वाटत असेल तर पुढाकार व लोकसहभाग महत्त्वाचा आहे."*
मित्रानो लोकसहभाग हा फक्त गावातील पालकांचा,समाजातील लोकांचा अथवा संस्थांचा असून उपयोग नाही तर त्यात आपला वाटा सुध्दा असणं फार महत्त्वाचं आहे. आज या शाळेला वर्षाअखेर ४०००० ते ५०,०००हजार रुपये खर्च माझा स्वतःचा असतो.पगारातील काही वाटा या शाळेला असतो. आज ही शाळा माध्यमिक शाळा झाली आहे. आज या शाळेत वर्ग १ ते १० आहे. लोकसहभागातून घेतलेले शेत सुद्धा कमी पडू लागले तेव्हा या वर्षी "माझी शाळा सुंदर शाळा" या मिळालेल्या निधीतून व माझे स्वतःचे १,००,०००/(एक लक्ष )रुपये देऊन शाळेला परत नवीन शेतजमीन खरेदी केले. या कामाने मला स्वतःला नाव जोश,काम करण्याची जिद्द सोबतच ही शाळा ३६५ दिवस सतत चालवून मला वेगळं आनंद मिळत आहे. शाळेला वेळ ,श्रम व पैसा देऊन जे समाधान आज मला मिळत आहे ते अलौकीक आहे.जे मी कदाचित शब्दातून नाही सांगू शकणार...... त्यात माझ्या परिवाराने मला दिलेली साथ हे तर माझ्यासाठी अविश्वसनीय आहे.
ही शाळा ३६६ दिवस चालणारी शाळा म्हणून आज देशात विदेशात ख्याती मिळवत आहे. याचे सर्व श्रेय लोकसहभाग याला जात.लोकसहभागातून अशक्य ते साध्य केल्या जाऊ शकत. मित्रानो तुम्हाला मिळालेली अधिकारी-पदाधिकारी यांची साथ याची सुद्धा लोकसहभाग यात गणना करता येईल.
*"आज लोकसहभाग याला अन्यसाधारण महत्त्व आले आहे आणि ते आपण चांगले कार्य करत समाजातून मिळवू शकतो."*
शिक्षक हा समाजाचा कणा आहे, समाज घडविण्याचे प्रथम कार्य हे शिक्षकांचे आहे. तेव्हा आपण स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे.
*" कल करे सो आज ,आज करे सो अब "*
या म्हणी प्रमाणे कामाला लागुया व लोकसहभाग वाटा आधी स्वतः स्वीकारू या........
लेखन......
राजेंद्र उदेभान परतेकी (वि.शि.)
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पालडोह
राज्य पुरस्कार प्राप्त सण २०२१-२०२२
मोबाईल क्रमांक 9881674994
आपल्या प्रतिक्रिया द्या....