वाशिम : परमहंस संत श्री बंम महाराजाच्या यात्रा महोत्सवा निमित्त अमरावती जिल्ह्यातील, मोर्शी तहसिल लगतच्या लिहीदा या गावखेड्यात दरवर्षी श्रीमद भागवत कथा सप्ताह व त्यानिमित्त लहानमोठ्या समाज प्रबोधनकारांच्या किर्तन प्रवचन व्याखानाचे आयोजन करीत समाज प्रबोधन केल्या जात असते. सदर श्रीमद् भागवत सप्ताहानिमित्त पंचक्रोशीच्या गावखेड्या सोबतच अकोला, वाशिम,अमरावती जिल्ह्यातुनही अनेक वारकरी,भजनी मंडळे व सद्भक्त हजेरी लावत असतात.
अशा या श्रीमद् भागवत सप्ताहानिमित्त लिहीदा येथील रहिवाशी सद्भक्त रविन्द्र मुळनकर आणि सौ. रूपाली मुळनकर यांची द्वितीय कन्या आणि श्री. विवेकानंद विद्या मंदिर शिरखेड या संस्थेची इयत्ता नववीची विद्यार्थीनी कु. तनवी रविंद्र मुळनकर हिने शिवचरित्रावर व्याख्यान देवून पंचक्रोशीतील उपस्थितांमध्ये प्रचंड चैतन्य-शौर्य आणि स्फूर्ती निर्माण केली. आपल्या वाक्चातुर्याने तिने कोठेही न अडखडता कमालीच्या विरश्रीने आपले व्याख्यान केले व उपस्थितांची मने जिंकली. त्यामुळे संबंध सप्ताहात पंचक्रोशीमध्ये ह्या कोवळ्या मुलीचे सर्वत्र कौतुक होत होते. समाजमाध्यमावर सुद्धा तिचे व्याख्यान सर्वत्र प्रसारीत होत होते व त्यामुळे तिचेवर अभिनंदन आणि स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे.कारंजा येथील समाजमाध्यमावर तिचे व्याख्यान दिसताच स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,प्रदिप वानखडे, उमेश अनासाने,लोमेश पाटील चौधरी,विजय खंडार आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनिय म्हणजे कु.तनवी रविन्द्र मुळनकर ही कारंजा येथील श्री कामाक्षादेवी संस्थानचे मुख्य गोंधळी ज्ञानेश्वरजी कडोळे यांची नात असून ज्येष्ठ कलावंत संजय कडोळे तसेच कमलेश कडोळे यांची भाची आहे. या निमित्ताने व्यक्त होतांना,\"कु तनवी मुळनकर हिला उचीत मार्गदर्शन मिळाल्यास निश्चितच ती चांगली व्याख्याती चांगली किर्तनकार म्हणून नावारूपाला येवू शकते.\" असा विश्वास कारंजाच्या कडोळे परिवाराने व्यक्त केला आहे.