कारंजा : अखंड मानवसेवा, निष्काम कर्मयोगाची आणि भागवत धर्म-वारकरी संप्रदायाची शिकवण देणाऱ्या, "अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री गजानन महाराज" यांच्या प्रगटदिनानिमित्त, येत्या सोमवारी, माघ वद्य सप्तमीला दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी, श्रींच्या भक्तमंडळींनी सामुहिक व सार्वजनिक रित्या श्रींच्या प्रगटदिन महोत्सवात सहभागी व्हावे. आपल्या कारंजा शहरात आज प्रत्येक वस्त्या, मोहल्ले, वेटाळ, वसाहती मध्ये ठिकठिकाणी आपण श्री भक्तांनी श्रींची मंदिरे, संस्थाने उभारलेली आहेत. व त्या प्रत्येक मंदिर व्यवस्थापनांनी सुध्दा श्रीक्षेत्र शेगाव संस्थानचा आदर्श घेऊन, नि:स्वार्थ सेवाधर्माची दिक्षा घेतलेली आहे. हा आदर्श साधासुधा नसून, आपल्या राष्ट्रात, समाजात निव्वळ मानवता प्रस्थापित करणारे हे पहिले पाऊल आहे. व त्याची सुरूवात आपण सर्वांनी स्वेच्छेने स्वतः पासून केलेली असल्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वरही तुमच्या माणुसकी व सेवाधर्माच्या वागणूकीने निश्चितच प्रसन्न होऊन तुमची अनुभूती घेत असेल. श्री संत गजाननाच्या भक्ताकडे कोठेही स्वार्थाला जागा नाही. त्यामुळे निश्चितच थोर संत महात्म्यांनी स्थापन केलेला वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे. गावोगावी ठिक ठिकाणी श्रीमद्भागवत कथा, किर्तन, प्रवचन, भजन, पूजन,श्री शिवपुराण कथा, रक्तदान, नेत्रदान,रोग निदान शिबीरे, व्यसनमुक्ती शिबीरे, अन्नदान , महाप्रसाद, भंडारे होत आहेत. ही सकारात्मक व भूषणावह गोष्ट आहे. आपल्या संस्थानमध्ये बुवाबाजी, अंधश्रध्देला तिळमात्रही स्थान नसून, निव्वळ समाजप्रबोधनाच दृष्टिकोन आपण बाळगला आहे . आता आपण श्रींचा प्रगटदिन आणखी संस्मरणिय करण्याकरीता आणि घरोघरी श्रींच्या दिंड्या, पालखी, मिरवणूकीचे स्वागत करण्याकरीता, प्रत्येकाच्या घरोघरी, अंगणात व रस्त्यावर जलसिंचन, सडासंमार्जन, रांगोळ्या, दिव्याची आरास करून, विद्युत रोषनाई करून घरोघरी भागवत धर्म आणि वारकरी धर्माची भगवी पताका फडकवावी. असे विनम्र आवाहन जय भवाणी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाचे अध्यक्ष तथा संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभाग तालुका प्रमुख संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....