सात दिवसांपूर्वी शहरातील कंजर मोहल्ला येथे एलसीबीच्या पथकाने धाड घालून बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. या बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार रवींद्र उर्फ बिट्ट कंजर हा पोलीस दिसताच मागच्या दारातून पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस बिट्टच्या मागावर होते. दरम्यान, बिट्टू कंजर चंद्रपुरात परत आल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला बनावट दारूसाठी आवश्यक साहित्य पुरविणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी नागपुरातून अटक केली असून सुनील बारई रा. दुर्गावतीनगर नागपूर असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे
कुख्यात दारुमाफिया रवींद्र कंजर हा एका नामांकित ब्रॅण्डच्या दारूमध्ये घातक असे रसायन मिसळून बनावट दारू तयार करीत असल्याची आणि नवीन बॉटल्समध्ये पॅक करून ग्राहकांना विकत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे २१ एप्रिल रोजी एलसीबीच्या पथकाने त्याच्या कंजर मोहल्ल्यातील निवासस्थानी धाड घातली. यावेळी नामांकित कंपनीची दारू, जीवघेणे रसायन, लेबल, रिकाम्या बॉटल्स आणि झाकण असा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. परंतु, पोलीस धडकताच रवींद्र कंजर हा मागच्या दाराने पसार होण्यात यशस्वी ठरला होता. तेव्हापासून पोलीस रवींद्र कंजरच्या मागावर होते. सात दिवसानंतर कंजर हा चंद्रपुरात परतला असून, तो घरीच असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळारचून त्याला अटक केली. बनावट दारूसाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणाऱ्याची चौकशी केली असता सुनील बारई याचे नाव पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी नागपुरातून सुनील बारई याला अटक केली आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक : अतुल कावळे, पोलीस अमलदार संजय अतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, रवींद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, गोपाल अतकुलवार, नरेश डाहुले, प्रांजल झिलपे, चंद्रशेखर आसुटकर, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, उमेश अरोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.