सरडपार येथे ट्रक व दुचाकी अपघातात १६ वर्षीय युवतीच्या एका पायाचा चेंदामेंदा झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. आचल मांदाडे (रा. नवेगाव, जि. गडचिरोली) असे जखमी युवतीचे नाव आहे.
अशोक मांदाडे हे सिंदेवाही तालुक्यातील गिरगाव येथे गुरुवारी विवाहाच्या स्वागत समारंभाला आले होते. सकाळी ते आपल्या दोन मुलींसह नवेगाव या स्वगावी दुचाकी (एमएच ३३एबी ३१४५)ने जात होते. सरडपार बसस्थानकाजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. पुढे ट्रक असल्याचे पाहून ते तिथे थांबले. अशातच मागावून येणाऱ्या ट्रक (एमएच ३४ एबी ५९४२) ने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी ट्रकच्या समोरील भागात घुसल्या आचलचा पाय चाकात सापडल्याने चेंदामेंदा झाला. यातून अशोक मांदाडे (वय ४५), मयूरी मांदाडे (१४) हे दोघे थोडक्यात बचावले. या प्रकरणी ट्रकचालक भक्त प्रल्हाद पुरणपाल (५२, रा. बल्लारशा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.