मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यामध्ये चित्त्यांचे मृत्यू थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी सातव्या चित्त्याच्या मृत्यू नंतर अवघ्या दोन दिवसांनी आठव्या चित्त्याचा मृत्यू झाल्याने वनविभागाचे धाबे दणाणले आहेत.सूरज नावाच्या आफ्रिकन चित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच महिन्यात आठव्या चित्त्याचा मृत्यू आहे. सूरजपूर्वी चार चित्ते आणि तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याने चित्ता देशात आणण्याच्या उपक्रमावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
सूरज कुनो अभयारण्यात मृतावस्थेत सापडला. या घटनेनंतर वनविभागात एकच खळबळ उडाली. दोन दिवसापूर्वीच तेजस नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस आणि सूरज या दोन चित्त्यांची मागच्या काही दिवसांत भांडण झाले होते. या भांडणात तेजसच्या गळ्याजवळ गंभीर जखम झाली होती आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या भांडणात सूरज चित्ताही गंभीर जखमी झाला होता. यामुळे आज अखेरचा श्वास घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अग्नि नावाचा चित्त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी मोठा गाजावाजा करत आफ्रिका खंडातील नामिबिया येथून काही चित्ते हिंदुस्थानमध्ये आणण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून हे चित्ते हिंदुस्थानात आणण्यात आले होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांत त्यातील आठ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.