वाशिम : वाशिम जिल्ह्यासोबतच, कारंजा तालुक्यात जुलै महिन्यापासून अति पावसाने थैमान घातलेले असून, गेल्या आठवड्यात कहरच झालेला होता . त्यानंतर रविवार, दि ६ ऑगस्टच्या दुपारपासून संपूर्ण रात्रभर आणि सोमवारी सकाळपासूनच, ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतामध्ये तळी साचल्याच्या तक्रारी येत आहेत. शेतातील उभी पिके सडत आहेत. शिवाय गोगलगाय सदृश्य किटक अळ्यांनी थैमान मांडलेले असून, शेतातील पिकांमध्ये कमालीचे तण वाढलेले असल्यामुळे, कारंजा तालुक्यातील पंचक्रोशीतील डाबरीच्या शेतीची सर्वत्र दुरावस्था झालेली आहे . त्यामुळे बळीराजाचा अंत न पाहता महसूल विभागाने, तात्काळ पंचनामे करून, शासनाकडे, ओल्या दुष्काळाबाबतचा अहवाल सादर करावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे .

तसेच शासनाचे मुख्यमंत्री,ना एकनाथजी शिंदे तथा उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यासोबतच कारंजा तालुक्याचा ओला दुष्काळ सदृश्य पिक पाहणी दौरा करून, त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करीत, नुकसानग्रस्त शेतकरी व घराची पडझड झालेल्या ग्रामस्थांना आपात्कालिन अर्थ सहाय्य हातोहात देण्याची मागणी सुद्धा ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी केली असल्याचे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदे वाशिम यांचेकडून प्रसार माध्यमाला कळविण्यात आले आहे.