चंद्रपूर, दि. 19 : शेतकऱ्यांमध्ये उच्च उत्पादकतेस प्रोत्साहन देऊन नवे तंत्रज्ञान अंगीकारण्यास प्रेरणा देणे तसेच त्यांच्या यशाचा आदर्श इतर शेतकऱ्यांसमोर मांडणे, या उद्देशाने खरीप हंगाम सन 2025 साठी राज्यात पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
या पिकस्पर्धेचे आयोजन कृषी विभाग यांच्यामार्फत करण्यात आले असून सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या एकूण 11 पिकांकरिता ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : मूग व उडीदसाठी 31 जुलै 2025 असून इतर पिकांसाठी 31 ऑगस्ट 2025 आहे. प्रवेश शुल्क (प्रत्येक पिकासाठी) सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये, आदिवासी गटासाठी 150 रुपये.
स्पर्धेच्या अटी : स्पर्धकाच्या नावावर स्वतःची जमीन असणे व ती जमीन स्वतःच कसणे आवश्यक. एका शेतकऱ्याला एकाहून अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. भातासाठी किमान क्षेत्रफळ 20 आर, इतर पिकांसाठी 40आर (1 एकर) सलग लागवड आवश्यक.
आवश्यक कागदपत्र : विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी गटासाठी), 7/12 वरील चिन्हांकित क्षेत्राचा नकाशा, बँक खाते (पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत),
बक्षीसांचे स्वरूप : तालुकास्तर प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार, तृतीय 2 हजार रुपये आहे. जिल्हास्तर प्रथम बक्षीस 10 हजार रुपये, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रुपये असून राज्यस्तरावरील प्रथम पारितोषिक 50 हजार, द्वितीय 40 हजार व तृतीय 30 हजार रुपये या प्रमाणे बक्षीसांचे स्वरुप आहे.
येथे करा संपर्क : योजनेविषयी अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. या
पिकस्पर्धेमुळे उत्पादक शेतकऱ्यांना सन्मान व प्रेरणा, तसेच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
00000
आपल्या प्रतिक्रिया द्या....