जंगलमार्गाने देवलापारकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. यात दोन वर्षांची चिमुकली जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात मंगरली देवलापार दरम्यान सोमवार 26 जून रोजी सकाळी 10. 30 ते 11 वाजता दरम्यान घडला. टिप्परच्या मागच्या चाकात येऊन नायरा नंदकिशोर चौधरी रा. पिटेसुर ही जागीच गतप्राण झाली. अपघात घडताच घटनास्थळावरून पळ काढलेल्या टिप्परला देवलापार पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अडवून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अपघाताची सूचना गोबरवाही पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मौका चौकशी केली. त्यात मिळालेल्या माहितीनुसार टिप्पर रेतीभरून देवलापारच्या दिशेने मंगरली मार्गे निघाला होता.तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस हद्दीत मोडणारे मंगरली हे जंगलव्याप्त गाव आहे. पिटेसूर येथील नंदिकशोर चौधरी हे एम एच 36 पी 2319 क्रमांकाच्या दुचाकीने आपली आई व मुलगी नायरा यांना घेवून अर्जुनी गावाकडे जात होते. एम. एच. 40 बी. जी. 7778 क्रमांकाचा टिप्पर त्यांच्या मागेच होता. निमुळता रस्ता असल्याने घटनास्थळावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका जड वाहनाला मार्ग देण्याकरीता चालकाने आपला टिप्पर मागे घेतला. त्यात मागे दुचाकीवर असलेल्या नंदकिशोर हॉर्नचा वाजवून चालकाला इशारा देण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यातचटिप्परने दुचाकीला येऊन धडकला. यात आजी रायाबाई व वडील डाव्या बाजूला तर चिमुकली नायरा ही उजव्या बाजूला पडली. टिप्परच्या मागील चाकात येऊन ती चिरडल्या गेली. घटना लक्षात येताच टिप्पर चालकाने गाडी पळवून नेली. मात्र स्थानिकांनी पाठलाग करून देवलापार पोलिसांच्या मदतीने वाहन चालकाला ताब्यात घेतले. अपघात गोबरवाही पोलिस हद्दीत घडल्यामुळे देवलापार पोलिसांनी प्रकरण गोबरवाही पोलिसांना हस्तांतरित केले. टिप्परसह चालकाला ताब्यात घेऊन गोबरवाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.