"पालकमंत्री ना .दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते; मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत उपक्रम "
वाशिम : मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सर्वसमावेशक सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार वाशिम जिल्ह्यातील ९५ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.
यामध्ये अनुकंपा धोरणांतर्गत ४९ उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त ४६ उमेदवार यांचा समावेश असून नियुक्ती आदेश वितरण सोहळा दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम (नियोजन भवन समिती सभागृह) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण होणार आहे.
नियुक्ती आदेश मिळणारे सर्व उमेदवार, संबंधित नियुक्ती प्राधिकारी तसेच जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांनी सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
या सुधारित धोरणामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना रोजगार व आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार असून शासनाच्या रोजगारोन्मुख धोरणांना गती मिळणार आहे. पालकमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणारा हा सोहळा वाशिम जिल्ह्यासाठी रोजगार क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
तसेच या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.