वाशिम : साधारणतः गेल्या महिनाभरा पासून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत,मानधन लाभार्थी वृद्ध लोककलावंताच्या आधार कार्ड नंबर,मोबाईल नंबर द्वारे त्यांचे मानधन खाती अद्यावत करण्याची प्रक्रिया,समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद येथे युद्धपातळीवर प्राधान्याने सुरु आहे. परंतु तरीही एकूण लाभार्थी लोककलावंतापैकी अर्ध्या अधिक लोककलावंताचे आधारकार्ड मोबाईल नंबर प्रमाणिकरण होणे बाकी आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामिण भागातील शेकडो रहिवाशी लोककलाकाराचे आधार कार्ड प्रमाणिकरण झालेच नाही.त्यामुळे अद्याप पर्यंत त्यांची मानधन खाती अद्यावत झाली नसल्याची सत्य परिस्थिती आहे. विशेष म्हणजे विदर्भ लोककलावंत संघटना या कलाकाराच्या अग्रणी संस्थेचे सेवाव्रती अध्यक्ष संजय कडोळे यांच्या पुढाकारातून आणि जिल्ह्यातील सर्वच वृत्तपत्रे आणि पोर्टल व चॅनलच्या सेवाभावी सहकार्याने वेळोवेळी कलावंताना जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.आणि लोककलावंताना एखाद्या सेतू केन्द्र किंवा सेवा केंद्रात जाऊन, महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या महाकलासन्मान या संकेतस्थळावर वेळोवेळी (ऑनलाईन) आधार कार्ड नोंदणी करण्याचे किंवा जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद कार्यालयात आधारकार्ड व मोबाईल घेऊन संबंधित अधिकारी यांना समक्ष भेटण्याचे आवाहन केले आहे.परंतु तरी देखील शेकडो कलाकारांची आज पर्यंत शंभर टक्के नोंदणी होऊ शकलेली नाही.त्यामुळे यापुढे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक, पटवारी,कोतवाल तसेच नगर पंचायती व नगर पालिका यांच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून किंवा लाभार्थी मानधन उचलत असलेल्या बँकांमार्फत कलावंतांना सूचना द्याव्यात.आणि आधार कार्ड नोंदणी करून घ्यावी.तसेच त्याकरीता सर्वप्रथम आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर अद्यावत करण्याकरीता कलावंताना प्रशासनामार्फत अवगत करावे. त्यासाठी आणखी एखादा महिना डीबीटी करीता कार्यकाल (अवधी) वाढवून मिळावा.अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी शासनाकडे केली आहे. तसेच मानधन लाभार्थी लोककलावंतानी आपल्या सहकारी मानधन लाभार्थी लोककलावंताना आधारकार्ड मोबाईलशी संलग्न करून त्याची संपूर्ण माहिती तातडीने,जिल्हा समाज कल्याण कार्यालयाला देण्याचे आवाहन केले आहे.