कारंजा : प्रशांत महासागरात तयार झालेल्या अल निनोच्या उद्रेकामुळे जगभरातील हवामानात बदल होत असतात. कदाचित त्याचा उद्रेक जून महिन्यापासून दिसून येत आहे त्यामुळे विदर्भातील वातावरणात उष्णता वाढली आहे.जून महिना पावसाळ्याच्या प्रारंभीचा महिना असतो. दि. ८ जून २०२३ रोजी, सूर्याचा मृगनक्षत्र प्रवेश झाला. पावसाळ्याच्या प्रारंभीचे पाहिले शुभ मुहूर्त म्हणून मृग नक्षत्र ओळखले जात असते.त्यामुळे शेतकरी या मुहूर्ताला फार महत्व देतात मृगामध्ये पेरणी झाल्यास शेतकऱ्यांची चिंता दूर होते.परंतु मृग नक्षत्रा मध्ये पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने,मशागत करून पेरणी करीता तयार असलेला विदर्भातील बळीराजा आता चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे.जून महिना आषाढी वारीचा महिना असल्याने, विदर्भातील बळीराजाची पाऊले,पांडूरंगाला साकडं घालण्याकरीता पंढरीच्या दिशेने,पाणावलेल्या डोळ्यांनी वळत आहेत.तर दुसरी कडे शिवालये पाण्यानी भरली जात आहेत.तर कोठे "धोंडी धोंडी पाणी दे." ची हाक पावसाळ्याच्या प्रारंभीच ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पेरण्या लांबल्या असल्याची जाणीव बळीराजाला लागली असल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.चालू हंगामात आषाढी एकादशी नंतरच पेरण्या होण्याची शक्यता असून, शेतकर्यांनी चांगले मुबलक पाणी जमीनीत मुरल्या शिवाय पेरण्या करू नयेत असा इशारा देण्यात येत आहे.