चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील पायली भटाळी नियत क्षेत्रात वाघीण मृतावस्थेत आढळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. वृद्धापकाळाने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील पायली भटाळी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ८८१ मध्ये नाल्याजवळ एक वाघीण फिरताना सोमवारी वनकर्मचाऱ्यांना गस्त घालताना दिसली होती. गावानजीक असल्याने तिचा दुसऱ्या दिवशी मागोवा घेत असतांना मंगळवारी तेथेच ती झोपलेली दिसली. पण काही हालचाल नसल्याने जवळ गेल्यावर ती मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचेअधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. सदर वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असून ती १० वर्षाहून अधिक वयाची आहे. तिचे दात झिजलेले दिसत आहेत. उशीर झाल्याने तिचे शवविच्छेदन बुधवारी चंद्रपूर येथील टीटीसी केंद्रात केले जात असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.