राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सर्वधर्म समभाव यावर खूप जोर दिला. सर्वधर्म समभाव हे राष्ट्रसंताच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्ये होते. त्यासाठी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्माय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वर वादाचा पुरस्कार करीत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला. त्यांनी सांगितले की, "आधी माणुसकी मग हिंदू मुसलमान" माणसाने आधी मानवधर्म पाळावा. मग जाती धर्माचा विचार करावा. कोणताही धर्म किंवा जात लोकांना एकत्र बांधू शकत नाही. त्यांचा सर्वधर्म समभाव या विचाराचा प्रभाव त्यांच्या साहित्यात, विशेषतः ग्रामगीतेमध्ये दिसतो. सामुदायिक प्रार्थना करताना वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन प्रार्थना करतील असा विचार मांडला.
राष्ट्रसंत धर्मांतराच्या विरोधात होते. सेवेच्या नावाखाली ख्रिस्ती लोक धर्मांतर करायचे हे त्यांना पटायचे नाही. राष्ट्रसंत म्हणतात, "सच्चा धरम नही जाना, तूने रे भाई । सच्चा धरम नही जाना ।।" सच्चा धर्म दिखाऊपणामध्ये नाही तर गरीबांची मदत करण्यात, त्यांची सेवा करण्यात आहे. गळ्यात माळ, कपाळावर टिळा लावतो आणि गरीबाची कदर करीत नाही. टिळा लावल्याने, माळ घातल्याने सच्चा धर्मी बनत नाही. महाराज म्हणतात, "राष्ट्रधर्म को बचाना सत धर्म है" राष्ट्रधर्म हाच आजचा व्हावा. भांबावलेल्या परिस्थितीतील जातीयता आपण एकसाथ नाहिशी केली पाहिजे. पक्षभेद नष्ट केले पाहिजेत. भारतात राहतील त्यांचा एकच धर्म असला पाहिजे. राष्ट्रधर्म हाच एकमेव धर्म सर्वांनी आपल्या अंगी बाळगावा.
धर्माची व्याख्या राष्ट्रीयतेला सोडून किंवा संप्रदाय दृष्टीने करणे म्हणजे धर्माचे विडंबन करणेच होय. महाराज पुढे म्हणतात, "मानवता ही पंथ मेरा । इन्सानियत है पक्ष मेरा । सबकी भलाई धर्म मेरा । दुविधाको हटाना कर्म मेरा । एकजात बनाना वर्म मेरा । निच उंच हटाना गर्व मेरा । गिरते को उठाना स्वर्ग मेरा ।।" ग्रामगीता सर्वधर्माचे महत्त्व सांगते आणि लोकांना कोणताही भेदभाव न करता एकत्र येऊन काम करण्याचा संदेश देते. कोणत्याही जाती धर्मात न अडकता सर्वांना सोबत घेऊन जाणारा समाज निर्माण करण्याचे राष्ट्रसंताचे स्वप्न होते. ईद, दिवाळी किंवा कोणताही सण सर्वांसाठी आनंदाचा आणि प्रेमाचा असावा असे त्यांना वाटत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धर्म कसा असावा हे खालील भजनात समजावून सांगतात.
घेतो धर्माची आण, मनी नाही इमान ।
धर्म अशानं कळायचा नाही रे ।
धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे ।।धृ।।
व्यक्ती हा धर्माची शपथ घेतो पण त्याच्या मनात त्याबद्दल खरी निष्ठा किंवा विश्वास (इमान) नाही. तो दिखाऊपणे धर्माचे पालन करतो. धर्म अशा पद्धतीने समजत नाही किंवा कळत नाही. धर्म कळण्याकरिता खोलात जाऊन विचार करणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे. धर्म हा मुलांचा खेळ नाही. धर्म हा विचारपूर्वक आणि गांभिर्याने समजून घेतला पाहिजे.
तीर्थक्षेत्री गेले, नाही एवढाच धर्म ।
व्रत जप केले, नाही एवढाच धर्म ।
दानपुण्य चाले, नाही एवढाच धर्म ।
माळा-भस्म-टिळे, नाही एवढाच धर्म ।
ही तो धर्माची, उपांग भाई रे ।।१।।
फक्त तीर्थक्षेत्री जाणे, धार्मिक विधी करणे म्हणजे धर्म नाही. त्यापलीकडे आपल्यात नैतिकता, आचरण, चांगले गुण असावेत. व्रत वैकल्ये करणे, मंत्र जप करणे म्हणजे धर्म नाही. केवळ दानधर्म करणे म्हणजे धर्म नाही. दानपुण्य करणे हा एक भाग आहे. दानधर्म करुन माणूस धर्माचे पालन करतो असे नाही. केवळ धार्मिक चिन्हे धारण करणे म्हणजे धर्म नाही. धर्माचा खरा अर्थ केवळ माळा, भस्म, टिळे लावणे, कर्मकांड करण्यापुरता मर्यादित नाही तर चांगली कर्मे, समाजासाठी योगदान ह्या गोष्टी असाव्यात. हे सर्व धर्माची उपांग आहे म्हणतात. उपांग म्हणजे धर्मामध्ये समाविष्ट असलेले विविध पैलू किंवा घटक.
तत्त्वाचा विचार, तोच खरा धर्म ।
सत्याचा आचार, तोच खरा धर्म ।
न्यायाचा व्यवहार, तोच खरा धर्म ।
करुणा अन उपकार, तोच खरा धर्म ।
वर्म धर्माचं समतेत राही रे ।।२।।
तत्त्वाचा विचार म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मुळाशी असलेल्या मूलभूत सिद्धांताचा किंवा तत्त्वांचा विचार करून समस्येचे निराकरण करणे हाच खरा धर्म आहे. सत्य बोलणे, सत्य वागणे, माणसाने सत्यनिष्ठ असणे हाच खरा धर्म आहे. न्यायावर आधारित आचरण करणे हाच खरा धर्म आहे. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाबद्दल सहानुभूती आणि दया वाटणे तर उपकार म्हणजे एखाद्यासाठी मदत करणे हाच खरा धर्म आहे. धर्माच मर्म किंवा रहस्य समतेमध्ये आहे. कोणताही धर्म असो त्याचा खरा उद्देश समता, न्याय आणि सर्वांशी समानतेने वागणे हाच आहे.
माझा धर्म न्यारा, अन तुझा धर्म न्यारा ।
करी भांडाभांडी, हा अधर्मची सारा ।
मानवता ठेवा अन, मग चर्चा करा ।
तुकड्या म्हणे जगाची धारणा सुधारा ।
बोलण्या चालण्यात, ताळमेळ पाही रे ।।३।।
प्रत्येक व्यक्तीचा धर्म वेगवेगळा आहे. कोणताही धर्म कनिष्ठ नाही. सर्वांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करायला हवा. भांडणे करणे, गैरवर्तन करणे हिंसाचाराकडे जाणे हा अधर्म आहे. माणसाने मानवता ठेवून सर्वांशी चर्चा केली पाहिजे. चर्चा केल्याने सर्वांचा विचार, दृष्टिकोन समजून घेता येते. राष्ट्रसंत म्हणतात, जगण्याची पद्धत, धारणा बदला. राष्ट्रसंत लोकांना जगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी हा संदेश देत आहे. दोन किंवा अधिक गोष्टीमध्ये सुसंगतता आहे की नाही हे तपासणे किंवा जुळवून पाहणे. बोलण्यात, चालण्यात ताळमेळ असावा. अयोग्य, चांगले, वाईट याचा विचार केला पाहिजे.
लेखक:- पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर*
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....