कारंजा (लाड) : मुळ नागलवाडी येथील,अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ,धार्मिक व सामाजिक सेवाभावी वृत्तीचे कविमनाचे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक द्वारा संचालित सेवा सहकारी सोसायटी कारंजाचे ग्रुप सेक्रेटरी हिम्मतराव प्रभाकरराव मोहकर यांना बुधवार दि.08 मे 2024 रोजी सकाळी 05:00 वाजता हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.नोकरी पूर्वी त्यांनी दैनिक देशोन्नतीचे ग्रामिण प्रतिनिधी म्हणून काम पाहीले होते.ते साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे सदस्य तथा तालुका प्रतिनीधी होते.साहित्याची त्यांना आवड होती . त्यामुळे त्यांनी अनेक कवितांची रचनाही केली होती. धार्मिक,आध्यात्मीक तसेच सामाजिक कार्याकरीता ते तन मन धनाने सेवारत रहायचे. संत गजानन महाराज संस्थान शेगावची ती पायी पदयात्रा करून वारी करायचे.अचानक घडलेल्या या दुःखद घटनेमुळे रुग्नालयात त्यांच्या सर्वच आप्त परिवार व मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने गर्दी केली होती व त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून हळहळत होता.त्यांच्या मागे वयोवृद्ध आई वडिल, लहान भाऊ, पत्नी,चिमुकली मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे.त्यांचा अंत्यसंस्कार सायंकाळी 04:30 वाजता त्यांच्या मुळ गावी करण्यात आला.या प्रसंगी त्यांचे लहान भाऊ रविन्द्र मोहकर यांनी भडाग्नी दिली.यावेळी पंचक्रोशितील हजारो आप्त स्वकिय मित्रपरिवाराची लक्षणीय उपस्थिती होती.अंत्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेत राजाभाऊ चव्हाण गुरुजी,पंचायत समिती कारंजाचे माजी सभापती दिलीप पाटील दवंडे,सेवा सहकारी संस्था बांबर्डा कामरगावचे गट सचिव मनिष पाटील कानकिरड,साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे संपादक संजय कडोळे आदींनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली तसेच उपस्थितांनी सामुहिक श्रद्धांजली वाहीली.