जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वाघ, बिबट व अस्वलांसारख्या हिंस प्राण्यांपासून धोका असतानाच रानटी हत्तींचाही धुमाकूळ गत दोन वर्षांपासून वाढला. त्यामुळे वनोपजावर अवलंबून असलेल्या लोकांच्या जीवनमानास कुठेतरी बाधा निर्माण झाली. छत्तीसगड - कोरची- मालेवाडा ह्या सीमावर्ती भागात राहून वारंवार लोकांना भयभीत करणारे रानटी हत्ती तेंदूपाने संकलनाच्या हंगामात पुन्हा धोकादायक ठरत आहे. नुकतेच हत्तींनी पिटेसूर भागात तेंदूमजुरांना भयभीत केले होते. गडचिरोली- छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात रानटी हत्तींचा वावर गेल्या दोन वर्षांपासून आहे. २३ च्या संख्येने असलेल्या कळपाचे एप्रिलमध्ये दोन भाग झाले होते. हत्तींचा अर्धा कळप कांकेर जिल्ह्यात, तर दुसरा अर्धा कळप गोंदिया जिल्ह्यात गेला होता. सध्या एक कळप कोरचीतील बेळगाव व गोंदिया जिल्ह्यातील चिचगड भागात असल्याची माहिती आहे.