कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : तालुक्यातील शासकिय कार्यालयाचे हृदयस्थान म्हटल्या जाणाऱ्या,खुद्द कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालय तथा तहसिल कार्यालय परिसरातच घाणीचे साम्राज्य पसरलेले असून,येथील कार्यालयाच्या प्रवेश महाद्वारावर, अपूर्णावस्थेत असलेल्या स्वच्छता गृहाचा उपयोग करतांना, नागरिकांना अस्वच्छतेला तोंड द्यावे लागते.येथील शौचालयाचे काम व मुत्रीघराचे काम अपूर्ण आहे.शिवाय तहसिल कार्यालयात येणाऱ्या महिला नागरिकांकरीता स्वच्छतागृहच नसल्याने त्यांची कुचंबना होत असते.जिर्ण झालेल्या इमारती भोवती कोठेही कर्मचारी व नागरिक लघुशंकेला बसतात. इमारती भोवती भरपूर जागा असून,येथे साफसफाई करून,वृक्षारोपण व वृक्षसंगोपन केले तर बगीचा करून,कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकरीता बसण्याकरीता दोन चार सिमेंट बाकडे ठेवल्यास, चांगली सोय होऊ शकते. शिवाय महत्वाचे म्हणजे खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकाकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही.तरी नागरिकांच्या सोईसुविधेकरीता,मे.उपविभागीय अधिकारी मा.ललितकुमारजी वऱ्हाडे तथा मे.तहसिलदार मा.कुणालजी झाल्टे यांनी पुढाकार घेऊन तहसिल कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकरिता,सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.