अकोला :-
गोस्वामी तुलसीदास जेव्हा काशीत वास्तव्यास होते तेव्हा ते तुलसी घाटावर राहत असत. त्यांच्या नावावरूनच त्या गंगा घाटाला "तुलसी"हे नाव दिले गेले आहे. त्यांनी आपल्या काशी वास्तव्यात कधीही नैसर्गिक विधी काशीत केले नाहीत. मलमूत्र विसर्जन करण्यासाठी ते नावेने गंगा पार करून पलिकडे जात आणि विधी उरकून परत येत.
एकदा असेच तुलसीदास नैसर्गिक विधी उरकून परत जात असताना तिथे एक प्रेत प्रकट झालं आणि म्हणालं की मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुझी इच्छा सांग. तेव्हा तुलसीदास म्हणाले की, पण मी तुला कधी प्रसन्न करून घेतलं ? त्यावर प्रेत म्हणालं, मी अपवित्र पाण्यावर जगतो. तुम्ही तुमचे विधी झाल्यावर उरलेलं पाणी या बाभळीच्या झाडाला टाकता, त्या पाण्यावरच मी जगत आलो आहे आणि आता तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. यावर तुलसीदास म्हणाले की ठीक आहे, पण माझी कुठलीच इच्छा नाहीये, मला फक्त श्रीराम यांचं दर्शन घ्यायचं आहे. यावर ते प्रेत म्हणालं की हे सामर्थ्य माझ्यात नाही, पण हे दर्शन तुम्हाला कसं घडू शकेल हे मी सांगू शकतो. तुम्ही रोज रामकथा करता. तुमच्या कथेला दररोज हनुमान येतात. हनुमानाचे पाय धरा. तुम्हाला श्रीरामांचं दर्शन घडेल. त्यावर तुलसीदास म्हणाले की मी कसा हनुमानाला ओळखणार ? यावर ते प्रेत म्हणालं की कथेला सर्वात पहिल्यांदा हनुमान येतात. अगदी शांत बसून राहतात. अतिशय मळके कपडे घालून येतात आणि जेव्हा कथा संपते तेव्हा तिथलीच माती कपाळाला लावतात आणि जातात. यावरून तुम्ही मारुतीरायाला बरोबर ओळखू शकाल.
तुलसीदास यांनी पुढच्या कथेला बघितलं की मळके कपडे घातलेला एक वृद्ध सर्वात आधी कथेसाठी येऊन बसला. कथा झाल्यावर सगळे निघून गेल्यावर तो उठला आणि तिथलीच माती कपाळाला लावून तो तिथून जाऊ लागला. हे बघताच तुलसीदास आनंदी झाले आणि त्या वृद्धाच्या मागे जाऊ लागले. "प्रभू आता तरी थांबा..." करीत तुलसीदास त्या वृद्धाचा पाठलाग करू लागले. पुढे तो वृद्ध आणि मागे तुलसीदास. इकडे वृद्धाने आपल्या चालण्याचा वेग वाढवला, तिकडे तुलसीदासांनीही वेग वाढवला. आपल्या मागे तुलसीदास येत आहे आणि त्याने आपल्याला ओळखलं आहे हे हनुमंताला समजलं होतं. तुलसीदास यांना टाळण्यासाठी हनुमान जंगलात शिरले. पण आता मात्र हनुमान आणि तुलसीदास यांच्यातील अंतर वाढलं. तुलसीदास यांच्या हनुमानाला थांबवण्यासाठी मारलेल्या हाकांचा आवाज क्षीण होत गेला. म्हणता म्हणता हनुमान जंगलाच्या मध्य भागात आले आणि तेवढ्यात तुलसीदास यांनी येऊन त्या वृद्धाचे पाय धरले. तुलसीदास म्हणाले, प्रभू थांबा. मारुतीराया माझ्यावर दया करा. मला श्रीराम यांचं दर्शन द्या.
मारुतीरायाने एका झटक्यात तुलसीदास यांचे हात आपल्या पायापासून दूर केले आणि म्हणाले की मी मारुती नाहीये. माझी वाट अडवू नकोस. मला जाऊ देत. तुलसीदासांनी परत त्यांचे पाय धरले आणि म्हणाले की मी तुम्हाला ओळखलं आहे. तुम्ही जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण करीत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. प्रभू मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन द्या. तुलसीदास विनवण्या करीत राहिले. शेवटी हनुमानाने तुलसीदास यांना त्यांचं प्रत्यक्ष दर्शन दिलं. ज्या ठिकाणी तुलसीदास यांना हनुमानाचं हे दर्शन घडलं, तिथेच आज काशीचं अतिशय प्रसिद्ध "संकट मोचन हनुमान मंदिर"आहे. या मंदिरात हनुमानाचं प्रत्यक्ष चैतन्य जाणवतं.
हनुमान पुढे म्हणाले की तुला जर श्रीराम यांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुला चित्रकूट येथे जायला हवे. तिथे स्वामी नित्य येतात. तिकडे गेल्यावर तुला अतिशय सुंदर अशा दोन सुकुमारांचं दर्शन घडेल. तुलसीदास चित्रकूट येथे गेले. तिथे श्रीराम भक्तीत लीन झाले. एकदा ते चित्रकूट परिक्रमा करीत असताना त्यांना घोड्यांवर स्वार झालेले अतिशय सुंदर असे धनुष्यबाण घेतलेले दोन तरुण दिसले. त्या दोघांना बघून तुलसीदास त्यांच्यावर असे मोहून गेले की ते त्या दोघांना ओळखू शकले नाहीत. ते दोघे जसे आले तसेच तुलसीदास यांच्या जवळून निघून गेले. तेवढ्यात तिथे हनुमान आले आणि म्हणाले की प्रभू त्यांच्या धाकट्या भावाबरोबर येथे आले होते. तुला भान राहिलं नाही, पण हरकत नाही. उद्या सकाळी परत एकदा तुला प्रभूंचं दर्शन घडेल.
दुसर्या दिवशी मौनी अमावस्या होती. तुलसीदास राम घाटावर आसनस्थ होऊन श्रीराम यांची वाट बघू लागले. तेवढ्यात तिथे एक छोटा मुलगा आला आणि म्हणाला, बाबा, मला चंदन हवं आहे. तुम्ही द्याल का मला चंदन ? त्या लहान मुलाच्या मोहक मुखाकडे तुलसीदास बघतच राहिले. तुलसीदासांचं भान हरपलं आहे, हे हनुमानाने जाणलं आणि म्हणून हनुमानाने एका पोपटाचं रुप धारण केलं आणि म्हणाले,
"चित्रकूट के घाट पर, भई संतन की भीर,
तुलसीदास चंदन घिसे, तिलक करे रघुवीर।|"
तुलसीदास लगेच भानावर आले. त्यांनी श्रीराम यांना ओळखलं. तेव्हा रामजी त्यांच्या प्रत्यक्ष रुपात आले, तुलसीदास यांनी प्रभू श्रीराम यांना चंदनाचा टिळा लावला आणि प्रभू श्रीराम यांनीही तुलसीदास यांना चंदनाचा टिळा लावला आणि मग श्रीराम तिथून अंतर्धान पावले.
श्रीराम जय राम जय जय राम
कथासंग्रह
- मंजुषा जोगळेकर
(चैत्र शुद्ध षष्ठी, शके १९४६)
आपल्या प्रतिक्रिया द्या....