कारंजा (लाड) : समाजातील बेवारस असलेल्या अनाथ,निराधार,वयस्क, मतीमंद,मनोरुग्न व्यक्तींना मायेचा आसरा देवून त्यांची स्वतः जातीने काळजी घेऊन, तन-मन-धनाने सेवासुश्रूषा करणाऱ्या,त्यांचेसाठी वाशिम येथे आपले घर या नावाने आपला निवारा चालविणाऱ्या,अस्सल सेवाव्रती, तरुण-तडफदार-विश्वासू-कार्यदक्ष-हजरजवाबी आदर्श समाजसेविका मायमाऊली कविताताई सवाई यांचे आकस्मिकपणे,रविवार दि.29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या मृत्युपरांत त्यांच्या परिवारात त्यांच्या पश्चात त्यांची दोन लहान मुले आहेत.त्यांच्या आकस्मिक मृत्युमुळे त्यांचे आश्रमातील अनाथ,निराधार,मतिमंद, मनोरुग्न व्यक्ती पुन्हा निराधार झाल्या आहेत.मायमाऊली कविताताई ह्या हाडाच्या समाजसेविका होत्या.त्यांच्या कडे उत्पन्नाचा कोणताही आर्थिक स्त्रोत नसतांना,शासनाच्या आर्थिक मदती शिवाय त्या केवळ त्यांच्या मैत्रीणी आणि समाजातील थोर मनाच्या व्यक्तींच्या लोकवर्गणीतून बेघर, वेडसर,मतीमंद,अनाथ,दिव्यांग, निराधार व्यक्ती यांना आपले घर जाणवणारा आसरा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होत्या.स्वार्थी समाजाने उपेक्षीत ठरवीलेल्या निराधार-अनाथ-बेवारस-मतिमंद -मनोरुग्नाची त्या स्वतः जातीने सेवासुश्रूषा करायच्या.स्वतः त्यांना आंघोळ घालायच्या.त्यांना स्वतः कपडे नेसवायच्या.त्यांचे कपडे स्वतः धुवायच्या.स्वतः स्वयंपाक करून त्यांना लहान मुलांप्रमाणे जेवण भरवायच्या.त्यांचेवर रुग्नालयात उपचार करवून आपले मनोरूग्न लवकर बरे होऊन माणसात कसे येतील.त्याची काळजी घ्यायच्या. त्यांच्या संस्थेच्या ह्या आश्रमात रस्त्यांवर बेवारस हिंडणारे मनोरुग्न दाखल होत होते.आणि मायमाऊली कविताताई प्रेमाने व ममतेने त्यांची देखभाल करीत होत्या.त्यामुळे त्यांच्या आकस्मिक जाण्याने आज "अनाथांची मायमाऊली" निघून गेल्याची सर्वत्र चर्चा असून जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.त्यांच्या मृत्युने त्यांच्या परिवारात असलेली दोन मुले चि.सौरभ गजाननराव सवाई आणि चि.वेदांत गजानन सवाई ही पोरकी झाली आहेत.त्यांच्या पासून काळाने आधी पितृछत्र आणि आता मातृछत्र हिरावून घेतले आहे.त्यामुळे सवाई परिवाराची केव्हाही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात परिवारात सासुबाई,भासरे शरदराव सवाई, दिर संतोष सवाई,दुसरे दिर प्रशांत सवाई आणि माहेरकडे वृद्ध आई आणि दोन भाऊ आहेत.सोमवारी दि.30 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता बायपास स्थित हिंदु स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून, ग्रामिण भागातून शेकडोंचा जनसमुदाय उपस्थितीत होता. यावेळी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे आपल्या श्रद्धांजलीतून म्हणाले, "मायमाऊली कविताताई सवाई यांच्या आकस्मिक निघून जाण्याने सर्वांच्या काळजाला धक्का देणारी अघटीत गोष्ट घडलेली असून,आज त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या,निराधार, अनाथ,मतिमंद,मनोरुग्नांची मायमाऊली देवाघरी निघून गेली आहे.तत्पश्चात यापुढे निराधार, अनाथ,मनोरुग्नांची सेवा करण्याचे कार्य सर्वांनी त्यांचेप्रमाणेच अखंडीत सुरु ठेवले पाहीजे.त्यांनी सुरु केलेलं मानवी सेवेचं कार्य पुढे चालवीणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.असो,परमेश्वर सवाई परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती देवो." त्यानंतर उपस्थितांनी अनंतात विलीन होत असलेल्या मायमाऊली कविताताईला सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली.याप्रसंगी उपस्थितांच्या भावना अनावर होत होत्या.