_ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथे जुन्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन आपल्या बालपणीच्या आठवणीना उजाळा देत दिवाळीनिमीत्ताने आपापल्या क्षेत्रात कर्तुत्ववान असणाऱ्या मित्रांचा सत्कार केला. असं म्हणतात की मानवाच्या जीवनातील सर्वात सुंदर नाते हे मैत्रीचे असते. मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगद फुलणारं आणि एकदा फुलून झालं की, जन्मभर गंध देत झुलणारं!! असे हे नाते कधी गोड तर कधी आंबट, रुसवा फुगवा असणार असते. या नात्यापुढे किती बोलले तर शब्द अपुरे पडतील. आयुष्यात अनेक सोबती भेटत असतात पण जुने मित्र सोन्यासारखे असतात. असेच काहीसे चौगान गावात घडले._
_यामधे नुकताच पोलिस उपअधीक्षक (मोटर परिवहन) पदी निवड झालेल्या रामानंद मोरेश्वर कळसकर व नागभीड येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मालता नवलाजी दोनाडकर यांचा शाल, श्रीफळ, उपहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. रामानंद कळसकर यांची 2015 ला नगर परिषद सासवड येथे अभियंता पदावर नियुक्ती झाली होती. त्यांनी तिथे 2015 ते 2023 पर्यंत अभियंता पदावर उत्कृष्ठ कार्य केले. पण उराशी मोठे स्वप्न बाळगून असणाऱ्या रामानंद याने कर्तव्य बजावत असताना आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि त्याच्या मेहनतीचे फळ म्हणून त्याची 2023 रोजी पोलिस उपअधीक्षक (मोटर परिवहन) पदी निवड झाली. त्याचबरोबर मालता दोनाडकर ह्या नागभिड येथे अनेक वर्षापासून पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. कर्तुत्वाला स्त्री-पुरुष असा भेद नसतो आणि याचा प्रत्यय मालता बघितल्यानंतर आपल्याला येतो. मालताने स्वतःला पशुवैद्यकीय सेवेत वाहून घेत उत्कृष्ट कार्य केले. तिच्या उल्लेखनीय कार्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूर येथे तिला 2022-23 चा गौरव पुरस्कार प्रदान करत तिचा सन्मान केला. या अश्या कर्तृत्ववान मित्रांचा सत्कार जुन्या वर्गमित्रांनी एकत्र येत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
_राज्यभर विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मित्रांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता वर्ग 10 मधील सर्व मित्रांना एकत्र आणत "कृषक विद्यालयातील ते दिवस" हा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून आपल्या जुन्या मित्रांना दिलासा, प्रेरणा व आपुलकीची उब या माध्यमातून सतत मिळत असते. त्या माध्यमातूनच दिवाळीचे औचित्य साधत हा सत्कार सोहळा संपन्न झाला. सोबतच प्रत्येक जुन्या मित्रांच्या घरी दिवाळीच्या सणाला जाऊन एक एका मित्राची विचारपूस करून त्याला सदिच्छा भेट देण्याचा संकल्प सुद्धा या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सर्व वर्ग मित्रांनी केला. या सत्कार सोहळ्याला उद्योजक विजय भागडकर मुंबई, रामानंद कळसकर पोलिस उपअधीक्षक, मालता दोनाडकर पशुधन पर्यवेक्षक, उद्योजक पंकज तिडके, दिनेश शिवणकर ग्रा. पं. सदस्य, दुर्गेश मैंद, ईंजी. राहुल राऊत, रुपेश बांगरे, विनायक बावणगडे, दिपक मेश्राम मुंबई, गणेश मलोडे, मुन्ना दोनाडकर, प्रदिप बुराडे, श्यामसुंदर कोल्हे, देवनंदन ठेंगरी, गोपाल तोंडरे इत्यादी मित्रांची उपस्थिती प्रामुख्याने होती._