अकोला: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन यांच्या संयुक्त कार्यवाहीने 21 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता बार्शीटाकळी तालुक्यातील धाकली येथील होणारा बालविवाह रोखण्यात आला.
20 मार्च 2022 रोजी चाईल्ड लाईनला बार्शीटाकळी तालुक्यातील धाकली येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी गौरी गणेश वरघाट हिचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुषंगाने चाईल्ड लाईनच्या समन्वयिका हर्षाली गजभिये आणि टीम सदस्य सुदन डोंगरे यांनी 21 मार्च 2022 रोजी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे यांच्यासह पिंजर पोलिस स्टेशन येथे जावून पोलिसांना या बालविवाहाबाबत माहिती दिली. दरम्यान, पिंजर पोलिस आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन यांच्या संयुक्त कार्यवाहीने सदर बालिकेच्या घरी जाऊन बालविवाह थांबविण्यात आला. यावेळी बालिकेच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले आणि बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे समजावून सांगण्यात आले. पालकांकडून सदर अल्पवयीन मुलगी वयात आल्याशिवाय तिचा विवाह करणार नाही अशी लेखी हमी घेण्यात आली.
सुगत वाघमारे यांच्या नेतृत्वात गेल्या अठरा वर्षांपासून तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात महिला व बालकांच्या क्षेञात उल्लेखनीय कार्य केले जात आहे. तिक्ष्णगत संस्थेच्या अंतर्गत सिटी चाईल्ड लाईन आणि रेल्वे चाईल्ड लाईन या दोन संस्था बालकांच्या कल्याण आणि पुनर्वसनाच्या क्षेञात कार्यरत आहेत. यामधील सिटी चाईल्ड लाईनच्या पुढाकाराने हा बालविवाह रोखण्यात यश आले. सदर कार्यवाहीमध्ये बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. अजयकुमार वाढवे, पी. एस. आय. बंडू मेश्राम, हेडकॉन्स्टेबल संतोष हिराळकर, पो. कॉ. ज्ञानेश्वर राठोड, प्रीती भगत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, हर्षाली गजभिये, सुदन डोंगरे सहभागी झाले होते. त्यांना बार्शीटाकळी येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती उगले यांचे सहकार्य मिळाले