अकोला:- महाराष्ट्र शासनाकडून पत्रकारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याण योजना, आजार उपचार योजनांमधील दुरूस्त्या आणि पत्रकारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला किती रक्कम दिली जावी या बाबतच्या अभिप्रायांसाठी पत्रकार संघटनांकडून निवेदने घ्यावित अशा आशयाचे एक कार्यालयीन पत्र मा.संचालक वृत्त,माहिती आणि जनसंपर्क,यांच्या सहीने राज्यातील विभागीय संचालक व सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलीत.परंतू यामध्ये फक्त ३ दिवसांचा कार्यालयीन अवधी दिल्याने शासनाच्या उध्देशांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. खरोखरच या साऱ्या योजनांच्या सुधारणांबाबत शासनामध्ये प्रामाणिकता असेल तर याबाबतची निवेदने सादर करण्यासाठी राज्यातील पत्रकार संघटनांना किमान १५ दिवस ते १ महिन्याचा अवधी द्यावा,अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी महासंचालक,माहिती व जनसंपर्क यांचेकडे मेलवर पत्र पाठवून केली आहे. त्याची प्रतिलिपी या.मुख्यमंत्री आणि संचालक,वृत्त,माहिती आणि जनसंपर्क यांना पाठविण्यात आली आहे.
राज्यातील जास्तीत जास्त पात्र पत्रकारांना या योजनांचा लाभ मिळावा आणि योजनांच्या नियम व अटींमध्ये आवश्यक त्या दुरूस्त्या व्हाव्यात हा उद्देश यामागे असावा असे पत्रानुसार तरी कागदोपत्री दिसते.परंतू हे अभिप्राय मागविण्यासाठी हे पत्र बुधवार दि.११ जून रोजी काढण्यात आले.ते मेल वर १२ जून रोजी सर्वांना पोहचले असावे,आणि सोमवार दि.१६ जून रोजी आपल्या विभागातील पत्रकार संघटनांची निवेदने पाठवावित असा फतवा या पत्रातून काढण्यात आला.गुरूवार आणि शुक्रवार दोन कार्यालयीन दिवसांमध्ये एवढ्या घाईत हे अभिप्राय कसे पोहचू शकतील याचा विचार न करता काढण्यात आलेले हे पत्र आहे.राज्यातील अनेक जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून अजून संबंधित पत्रकार संघटनांना याबाबत माहिती देऊन संपर्कही साधता आलेला नाही. अशा अभिप्रायांची व दुरूस्त्यांची निवेदने सादर करण्यासाठी जुण्या नियम व अटींचे अवलोकन आवश्यक आहे.मागील काळात पत्रकारांच्या विविध प्रस्तावा़त काढण्यात आलेल्या अयोग्य आणि विपर्यस्त त्रूटींमुळे पात्र लोकांना झालेल्या वेदनांचा अभ्यास करून सुधारीत अभिप्राय व्यक्त करण्यासाठी पत्रकार संघटनांना वेळ देणे आवश्यक आहे.या वस्तूस्थितीचा विचार न करता काढलेले हे पत्र आणि दिलेली मुदत म्हणजे मुळ उध्देशांबाबत साशंकता वाटण्यासारखे आहे. कोणाचे अभिप्राय आले नाहीत या कारणासाठी घाईगर्दीत कागदी घोडे नाचवून ह्या सुधारणा फाईलबंद करण्याचा हा प्रयत्न आहे का? असे प्रश्न लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडे अनेक पत्रकार व्यक्त करीत आहेत.
शासनाने पत्रकारांच्या योजनांमध्ये पात्र लाभार्थींना योग्य तो न्याय देता यावा यासाठी पारदर्शकता आणि सुलभता निर्माण करण्यासाठी योग्य ते नियोजन ठेवावे.त्यासाठी ही निवेदने सादर करण्यासाठी पत्रकार संघटनांना किमान १५ दिवस ते १ महिन्याचा अवधी देण्यात यावा अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केली आहे.