कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेत शिवारातील कंपार्टमेंट ११६८ मध्ये आज दुपारी ३ वाजता घडली. हळदा येथील सात्राबाई नामदेव कांबळी (६०) ही महिला सकाळी १० वाजता धान कापायला गेली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेतामध्ये या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिच्या नरडीचा घोट घेत जागीच ठार केले व डोक्याचा भाग छिन्नविछिन्न अवस्थेत करून शंभर मीटर अंतरावर असलेल्या कंपार्टमेंट ११६८ मध्ये फरफटत नेले. या महिलेसोबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्याने सदर महिलेचा मृतदेह तिथेच टाकून वाघ पळुन गेला. सदर घटनेची माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात
आली माहिती मिळताच दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेन्डे, वनक्षेत्रसहाय्यक ए. पी. करंडे घटनास्थळी आपल्या ताफ्यासहित दाखल झाले. तसेच मेंडकी पोलिस घटनास्थळी दाखल पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.