राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विज्ञानवादी होते. त्यांनी विज्ञानाची प्रगती सोबतच तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांची सांगड घातली. त्यातून अंतिम सत्याचा शोध घेणे म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम साधणे होय. राष्ट्रसंत भारत देशाबद्दल म्हणतात.
आवो सुंदर देश बनाएँ ।
सुंदर अपना गांव बनाएँ ।।
वंदनिय राष्ट्रसंताच्या भजनातील या दोन ओवीमधून "ग्रामोदय" ते "भारत उदय" हे महाराजांचे जीवन ध्येय समाजाचे लक्ष वेधून घेते. पुढे महाराज म्हणतात.
चल ऊठ भारता आता ।
ही वेळ नसे निजण्याची ।
बुद्धीच्या तळावर ज्योती ।
झळकू दे कर्तव्याची ।।
राष्ट्रसंत भारतातील नवतरुणाला उठायला सांगतात आणि म्हणतात की, ही वेळ निजण्याची नव्हे तर विज्ञानाचे दृष्टीने आपल्या बुद्धीची ज्योत कर्तव्य करुन झळकू दे. आजचा तरुण हा उद्याच्या देशाचा आधारस्तंभ आहे. त्याच्यावर कुटूंब, समाज, राष्ट्र असा कर्तव्य पालन आणि जबाबदारीचा परीघ पार करता करता त्याला विश्वशांती पर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रसंताची तळमळ होती.
एकेकाळी भारत दैववादी होता. अनेक अंधश्रद्धांनी येथील लोकांची मने ग्रासून टाकली होती. अज्ञानामुळे तसे घडत होते. आपण तेव्हा पारतंत्र्यात होतो. आपण अडाणी असणे हे आपल्यावर राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या फायद्याचे होते. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपल्या देशाने वैज्ञानिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु हे विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी वैज्ञानिक संस्था काढल्या. वैज्ञानिक केंद्राना भरपूर सहाय्य केले. भाभा अणु संशोधन केंद्र काढले. अशाप्रकारे हळूहळू आपला देश वैज्ञानिक प्रगती करु लागला.
१९६३ साली भारताने पहिले राॕकेट उडवले. त्यानंतर अनेक उपग्रह अवकाशात पाठविले. मंगळयानाच्या यशाने या क्षेत्रातील शिखर गाठले. या अवकाश संशोधनामुळे भारताने माहिती तंत्रज्ञानात व मनोरंजनाच्या क्षेत्रातही अफाट प्रगती केली आहे. आज आपण जगातील अनेक देशांना आपले उपग्रह वापरायला देतो.
१९७२ सालापूर्वी देशात दुष्काळ पडला, लोक मृत्यूमुखी पडली. अमेरिकेतून निष्कृष्ट दर्जाचा लाल गहू खरेदी केला. भारताने हरितक्रांती केली. शेती करण्याच्या नव्या पद्धती, बी-बियाणे, रासायनिक खते, धरणे, कालव्याचे पाण्यातून धान्योत्पादन वाढविले. ही सर्व विज्ञानातील प्रगती आहे. आज जहाज बांधणी, राॕकेट्स् व उपग्रह इत्यादीच्या निर्मितीत भारत अग्रेसर आहे. भारतीय सैन्याला लागणाऱ्या नव्या प्रकारच्या तोफ, बंदुका, रडारयंत्रे, विमाने अशी बरीचशी साहित्य भारतात बनत आहे. क्षेपणास्त्रांच्या बाबतीत भारत पुढेच आहे. उर्जेच्या क्षेत्रात आपली प्रगती आहे. नद्यांचे पाणी अडवून त्याचा उपयोग सिंचन आणि विज निर्मितीसाठी करण्यात येतो. सौर उर्जा, पवनचक्की, औष्णिक विद्युत आणि अणुविद्युत इत्यादी क्षेत्रात भारताची प्रगती आहे. आपण अणुशक्तीचा उपयोग विधायक कार्यासाठीच करतो.
भारताने १९७४ साली अणुबाॕम्ब तयार केला. भारताच्या "इस्त्रो" ह्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने मंगळावर मानवरहित यान पाठवले आहे. कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत भारताची स्पर्धा इतर देशांशी होत आहे. भास्कर, एॕपल, इन्सॕट, रोहिणी असे बरेच उपग्रह आपण आकाशात सोडले. त्यामुळे दूरसंचार व्यवस्था सुदृढ झाली. हे सर्व विज्ञानाच्या प्रगतीनेच साध्य झाले.
आज आपला भारत बहुमजली इमारती, रस्ते, उड्डाणपुल, भूमिगत रस्ते, मेट्रो ह्या सर्व वैज्ञानिक प्रगतीच आहे. आज कृत्रिम गर्भधारणेतून टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग करून बाळ जन्माला येण्याचे विज्ञान उपलब्ध झाले. विज्ञानाचे क्षेत्रात भारत सातत्याने प्रगती करीत आहे. विज्ञानाने मानवाचे राहणीमान, खाणे, पिणे, आचार विचार, ज्ञान इत्यादी विषयांची चिंतन पद्धतीच बदलून टाकली. आज आपण भूगर्भातून पाणी खेचू शकतो. समुद्रातून बाॕम्बे हायवेतून निघणारे तेल हा भारतीय वैज्ञानिक प्रगतीचा जीवंत नमुना आहे. भारतातील आसाम राज्यात पेट्रोलियमच्या विहिरी शोधण्यात आल्या. रासायनिक खतांच्या साह्याने शेतजमिनीचे उत्पादन वाढविले. कापडाच्या कारखाण्यात कापड उत्पादन वाढवून आपली कापडाची गरज पूर्ण केली आहे.
औषधाचे कारखाणे काढले. मलेरिया, काॕलरा, प्लेग सारख्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविले. विज्ञानाने मानवाचा वेळ आणि शक्ती वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. भारतात आता यंत्राचे साह्याने कामे करता येतात. दळण, पीठ तिंबणे, धान्याची पेरणी, धान्याच्या पोती भरणे, वृक्ष तोडून फर्निचर बनविणे ही सर्व कामे यंत्राद्वारे होतात. दैनंदिन जीवनात अनेक क्रांतिकारक सोयी केल्या आहेत. रेडिओ, फँक्स, रंगीत टी.व्ही, टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, टेलिफोन, वाशींग मशीन, व्हँक्यूम क्लीनर, कुलर, पंखा, फ्रीज, हिटर, मिक्सर इत्यादी यंत्राची निर्मिती केली. तसेच भारताने दूरदर्शन मध्ये खूप प्रगती केली आहे.
घरातील चुलीची जागा गॕसने घेतली, गोबरगॕसचा उपयोग करून शेगडी पेटविली. वेगाने चालणारी विमाने, बस, ट्रक, कार, स्कूटर, रेल्वे इत्यादी वाहतुकीची साधने विज्ञानाची प्रगती आहे. भारतात संगणकाचा प्रवेश आणि त्याचा प्रसार आपल्या यांत्रिक प्रगतीकडे निर्देश करतो. पुस्तकाच्या प्रकाशाने ज्ञानाचे दिप घरोघर पेटविले. वृत्तपत्रांनी भारताला जगाच्या जवळ नेले. सिनेमाच्या क्षेत्रातील आपली प्रगती कौतुकास्पद आहे. विज्ञानाने मानवाचे राहणीमान पार बदलून टाकले.
१९ एप्रिल १९७५ ला सोव्हिएट अवकाश केंद्रातून "आर्यभट्ट" नामक उपग्रहाचे सफल प्रक्षेपण करुन भारताने अंतराळ युगात प्रवेश केला. १९८५ मध्ये "अनुराधा" नामक प्रयोगशाळा अंतराळात पाठवून सूर्य आणि ब्रम्हांडातील अन्य स्त्रोतापासून निघून पृथ्वीच्या वायुमंडळात येणाऱ्या ऊर्जा किरणांचे संघटन व तिव्रतेचे संशोधन केले. कृत्रिम उपग्रहाव्दारे आपली संचार व्यवस्था सुधारली. आपणांस ऋतूसंबंधी माहिती उपग्रहाव्दारे मिळते. एप्रिल १९८४ मध्ये स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा रशियन अंराळविर मेलिशेव ओ गेन्नाडी स्केकालेन यांच्या बरोबर अंतराळ यात्रा करुन आला. मानव पृथ्वीवरील सर्वक्षेष्ठ प्राणी आहे. ज्याने आपल्या बुद्धीने नित्य नवे चमत्कार करून आपले जीवन सुखमय बनविले.
चंद्रयान- ३ मोहीम भारताच्या चंद्र संशोधन कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे चंद्र आणि त्याच्या संभाव्य संशोधना बद्दलची आपली समज वाढवण्यास मदत करेल. हे मिशन अंतराळ संशोधनात भारताच्या क्षमतेचे प्रदर्शन करेल आणि देशाला या क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यास मदत करेल. चंद्रयान-३ मिशन १४ जुलै २०२४ रोजी प्रक्षेपित झाले. चंद्रयानाने चंद्रावरील फोटो पाठविले आहे. तेथे पाणी, आँक्सीजन, जीवन आहे का याची तपासणी चंद्रयान करणार आहे.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....