कारंजा : श्री नवरात्रोत्सव, श्री नवदुर्गोत्सव आणि श्री शारदोत्सव म्हटला म्हणजे खऱ्या अर्थाने महिला मंडळीचा म्हणजेच नारीशक्तीचा उत्सव होय. गेल्या सन २०२०-२१ मध्ये कोव्हिड १९ कोरोना महामारी संचारबंदीमुळे हा उत्सव मोकळ्या मनाने साजरा करता आला नव्हता. परंतु या वर्षी सन २०२२ मध्ये शासनाने सर्व निर्बंध हटवील्याने श्री नवरात्र उत्सवाला आनंद व उत्साहाचे उधाण येणार आहे. व सर्वत्र संस्थान,मंदिर, श्री नवदुर्गोत्सव श्री शारदोत्सव मंडळां मध्ये महिला मंडळीची गर्दी वाढणार आहे. उत्सव यात्रा म्हटली म्हणजे हौसे, गवसे, नवसे असणारच आहेत .त्यामुळे चिडीमारी, गुंडागर्दी, चोरट्यांची गर्दी सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे महीला मंडळींना सर्वोतोपरी संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची असणार आहे. त्यामुळे निर्भया पथक आणि पोलिस प्रशासनाने सतर्क राहून बंदोबस्त देणे गरजेचे आहे. प्रत्येक संस्थान, मंदिर, श्री नवदुर्गोत्सव मंडळ येथे सि सि टि व्ही कॅमेरे, फिरते कॅमेरे, ड्रोन कॅमेरे,वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था गरजेची राहणार असून, दारूड्या व व्यसनाधिन व्यक्तिंवर सुद्धा पोलिसांनी करडी नजर ठेवणे आवश्यक असणार आहे . व त्या दृष्टिने कारंजा शहर पोलिस स्टेशनकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे .