ज्येष्ठ पत्रकार तथा हाडाचे सामाजिक कार्यकर्ते कारंजाचे पोलीस पाटील- गोपाल पाटील भोयर यांचे आकस्मिक निधन.
शुक्रवार दि.22 सप्टेंबर 2023 रोजी,सकाळी सकाळी रोजची दैनंदिन दिनचर्या सुरु असतांनाच,सकाळी 08:30 च्या सुमारास,कारंजा शहरातील धडाडीचे आणि आघाडीचे पत्रकार,कारंजा शहरातील सर्व पक्षीय नेत्यांशी समन्वय साधणारे कर्तबगार,कारंजा शहरातिल सर्वधर्मिय बांधवाशी सलोखा ठेवून लहानमोठे तंटे किंवा भानगडी मिटवीणारे कारंजा शहरातील पोलीस पाटील,संत गजानन मित्र मंडळाचे सेवाधारी,अखिल भारतिय पत्रकार परिषदेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी स्व.गोपाल पाटील भोयर यांचे हृदय विकाराने निधन झाल्याचे वृत्त डॉ.शार्दूल डोणगावकर हॉस्पिटल कारंजा यांचेकडून ऐकायला मिळाले आणि क्षणभर विश्वासच बसला नाही.मन अगदी सुन्न होऊन गेले.न राहवून लगेच मी निकटवर्तीया कडून,भ्रमणध्वनी वरून शहानिशा करून घेतली.व लगेच वेळ न दवडता,जड अंतःकरणाने पत्रकार रोहीत महाजन यांचेसह स्व.गोपाल पाटील भोयर यांच्या निवासस्थानी पोहोचलो.तेथे माझ्या आधीच पत्रकार मित्रांचा गोतावळा आणि गोपाल पाटील यांच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. व वाट काढून घरात पोहोचलो तर घरामध्ये गोपाल पाटील अगदी शांत झोपलेले दिसत होते.मात्र ह्या स्थितीतही त्यांच्या चेहऱ्यावर अलौकीक तेज झळकत होते. त्यांना पाहूनही ते आज रोजी आपल्या मध्ये राहीले नाही याची खात्री होत नव्हती.वहीनींवर तर अगदी दुःखाचा डोंगरच कोसळला होता.मी आणि रोहीत महाजन यांनी अखेरचे अंत्यदर्शन घेतले,करंजमहात्म्य परिवारातर्फे आणि महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेतर्फे मौन आदरांजली व्यक्त केली.आणि जड पाऊलांनी बाहेर आलो.तर बाहेर त्यांची चाहती मित्रमंडळी धाय मोकलून विलाप करीत होती.ते क्षण मलाही अस्वस्थ करणारे होते.त्यांची एकूलती एक मुलगी शिक्षणाकरीता बाहेर गावी असल्या कारणाने मुलगी कारंजा येथे पोहोचल्या नंतरच,त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम सायंकाळी पार पडणार असल्याची माहीती मिळाली. मला अजूनही आठवते की,सन 1986 मध्ये महाविद्यालयात असतांना,गोपाल भोयर यांनी पत्रकारीते मध्ये पाऊल टाकले होते.त्यावेळी स्वतः मी माझे पत्रकारितेमधील गुरुवर्य स्व.दादा पिंजरकर यांच्या समवेत सावली प्रमाणे राहात होतो.आणि स्व. हुकूमचंदजी रॉय यांच्या साप्ताहिक विजय संदेश करीता शहर प्रतिनिधी म्हणून काम करीत होतो.त्याचवेळी गोपाल पाटील भोयर यांनी स्व.जुगलकिशोरजी शर्मा यांच्या साप्ताहिक जनता परिषद मधून शहर प्रतिनिधी म्हणून पत्रकारीता सुरु केलेली होती.त्यावेळी आम्हाला यशस्वी मार्गदर्शन करणाऱ्या मध्ये,तत्कालिन ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक जनता परिषदचे संपादक स्व.जुगल किशोरजी शर्मा,दै.मातृभूमिचे स्व.बाळाभाऊ येवतेकर,दै. शिवशक्तीचे स्व.नागेश कुळकर्णी,दै.नागपूर पात्रिकाचे प्रा.सुभाष गढीकर,दै तरुणभारतचे प्रा.स्व.सुधाकरजी नाफडे,दै.देशोन्नतीचे प्रा.स्व. नाखले,दै लोकमतचे गटागटजी इत्यांदीचे आम्हाला उत्तमोत्तम मार्गदर्शन मिळत होते. नेमके त्याच वेळी सन 1986 मध्ये,कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा शताब्दी महोत्सव पार पडणार होता.त्यावेळी पत्रकार परिषदा मधून गोपाल पाटील भोयर हे पत्रकारितेची चुणूक दाखवीत होते.पुढे कारंजा शहर पोलीस पाटील म्हणूनही त्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली व सदर जबाबदारी आपल्या कर्तव्य तत्परतेने आणि हजरजवाबीपणाने ते यशस्वी पणे निभवीत होते.जिल्हा प्रतिनिधी माधवरावजी अंभोरे यांनी त्यांचेवर कारंजा तालुक्याची दैनिक देशोन्नतीची जबाबदारी सोपविली आणि ही जबाबदारी आजतागायत आजीवन पर्यंत, तालुका प्रतिनिधी म्हणून गोपाल भोयर यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. कारंजा शहरातील कोणताही सामाजिक उपक्रम असो किंवा छोटा मोठा वादविवाद असो प्रत्येक ठिकाणी स्व.गोपाल पाटील भोयर यांची पोलीस पाटील या नात्यानेही भूमिका महत्वाची ठरत असे.एक जबाबदार सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची आवर्जून आठवण केली जात असे.कारंजा शहरातील सर्वपक्षिय-सर्वधर्मिय नागरिकांमध्ये प्रतिष्ठीत व्यक्ती-प्रतिभाशाली व्यक्ती-वजनदार व्यक्ती म्हणून त्यांचेकडे आदराने बघीतले जात होते.त्यांच्या शब्दाला राजकिय नेत्यां जवळ,शासकिय कार्यालयात,पोलीस स्टेशनमध्ये विशेष महत्व होते.ते स्वतः राजकारणात नसले तरी त्यांनी त्यांच्या अर्ध्यांगीनी पियुषाताई भोयर यांना कारंजा नगर पालिकेत दोन वेळा सदस्य म्हणून निवडून आणले होते.त्यांचे देखणे स्वरूप,हास्यमुख चेहरा,विश्वासू व मनमिळाऊ स्वभाव त्यामुळे कारंजा शहरातच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यात त्यांचा फार मोठा मित्रपरिवार होता.सामाजिक कार्यासोबतच त्यांना आध्यात्मिक व धार्मिक कार्याचीही आवड होती.संतनगरी शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज यांचे ते निस्सिम भक्त होते.कारंजा येथे श्रीक्षेत्र कोंडोलीच्या पितांबर महाराजांच्या पालखीच्या स्वागताची व्यवस्था सुद्धा सांभाळत होते.अशा प्रकारे आयुष्यभर यशस्वीपणे कारंजेकरांची मनोभावे सेवा करणाऱ्या या व्यक्तीकडून भविष्यातही कारंजेकरांना अनेक अपेक्षा होत्या,परंतु दुदैवाने या सेवाव्रती पुण्यात्म्याचे दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले असून त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर तर दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे.परंतु त्या सोबतच त्यांच्या मित्रपरिवाराची आणि कारंजेकर नागरिकांची देखील प्रचंड हानी झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शब्दांकन : संजय कडोळे (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पत्रकार) गोंधळीनगर, कारंजा (लाड) जि. वाशिम.