अमरावती : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दोन दिवसीय सिंहावलोकन शिबिर १ फेब्रुवारीपासून अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आले आहे.
शनिवारी सायंकाळी ४ वाजता पदाधिकारी परिचयाद्वारे शिबिराची सुरुवात होईल. सायंकाळी ६ ते ८ वाजतादम्यान ओबीसी समाजभूषणांचा सत्कार; ओबीसी, विजा, भज व विमाप्रसाठीच्या शासकीय योजनांविषयीचे उद्बोधन यावर ऋषभ राऊत प्रकाश टाकतील नंतर पदाधिकाऱ्यांशी खुली चर्चा केली जाईल.
दुसऱ्या दिवशी; रविवारी सकाळी ९ वाजता जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन, राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे यांचे स्वागतपर भाषण होईल. ओबीसी विचारवंत बबलू कटरे हे संघटनेची ध्येय धोरणे सांगतील. दुपारी २ ते ४ वाजतादरम्यान शिबिराचे समारोपीय सत्र होईल. राष्ट्रीय ओबीसी महासघाचे महासचिव सचिन राजूरकर "संघटनेची पुढील दिशा" स्पष्ट करतील. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे समारोपीय भाषणातून पदाधिकाऱ्यांना मागर्दशन करणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठी हे शिबिर आयोजित केले आहे.