कारंजा: लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या न्यायिक व्यवस्थेच्या बळकटी करणासाठी पक्षकार अशीलांना योग्य सुविधा उपलब्ध व्हावी व योग्य वेळेत न्यायदान व्हावे हा उद्देश सफल होण्यासाठी आपल्या दायित्वाचा विचार सुद्धा वकील न्यायाधीश या नात्याने व्हायला हवा, न्यायालयातील जुन्या व प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता तो काळा ठपका कसा दूर करता येईल दृष्टीने विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती माननीय नितीन सांबरे यांनी केले.
कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ न्यायमूर्ती मा.सांबरे यांच्या हस्ते दि 17/2/2025 रोजी पार पडला या प्रसंगी ते बोलत होते. या समारंभाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा वाशिम जिल्हा पालक न्यायमूर्ती मा. गोविंद आ सानप, महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल चे सदस्यद्वय एड.आशिष देशमुख, एड.मोतीसिंग मोहता, कारंजा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी कारंजा मा. पी डी देवरे तसेच कारंजा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. निलेश श्री पाटील (कानकिरड ) यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा.शिरीष कुमार हांडे होते.
कारंजा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी वरिष्ठ न्यायालयाच्या या प्रस्तावित इमारतीला 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान झाली असून कारंजा मूर्तीजापूर रोडवरील वेदांत पब्लिक स्कूल नजीकच्या प्रशस्त जागेत आकारास येणाऱ्या या न्यायालयीन इमारतीमुळे कारंजाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. याप्रसंगी सर्वप्रथम नादब्रह्म संगीत अकादमीच्या वतीने स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी न्यायमूर्ती जी. ए.सानप यांनी कारंजा येथील आकारास येणाऱ्या या इमारतीच्या कामाचा योग्य दर्जा कायम राखण्याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य पद्धतीने होईल ही अपेक्षा बोलताना व्यक्त करून विधीज्ञ मंडळाने या कामाबाबत सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याचे देखील त्यांनी कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश शिरीषकुमार हांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी नमूद केले की इमारतीमध्ये एकूण सात कोर्ट हॉल,लोक अदालत हॉल, पोस्ट ऑफिस, मध्यस्थी केंद्र सुसज्ज असे वकिलांकरीता ग्रंथालय व आसन व्यवस्था या व्यतिरिक्त उपहारगृह, स्वच्छतागृह अशा सर्व सुविधायुक्त न्यायालयीन इमारत कारंजा येथील वकीलांच्या सोयीसाठी व पक्षकार मंडळींना न्याय अधिक सुकर होण्याच्या दृष्टीने लवकरच आकारास येणार आहे.
या समारंभात वाशिम जिल्हा न्यायिक अधिकारी यांचे वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. एस व्ही हांडे यांनी मा. न्यायमुर्ती नितीन वा.सांबरे व मा. न्यायमूर्ती गोविंद आ.सानप यांचे स्वागत केले. तसेच कारंजा विधिज्ञ मंडळाचे वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ए. डी देशपांडे ॲड. व्ही आर छल्लाणी व ॲड. स्वप्नील नायसे सचिव यांनी, कारंजाचे आराध्य दैवत नृसिंह सरस्वती स्वामी यांची प्रतिमा,शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन दोन्ही न्यायमुर्ती यांचे स्वागत केले . सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे श्री अविनाश धोंडगे अभियंता सा. बांधकाम मंडळ अकोला यांनी व कारंजा विधीज्ञ मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ एड. डी के पिंजरकर ए.ए. खंडागळे व विधीज्ञ मंडळ अध्यक्ष ऍड. निलेश पाटील यांनी देखील स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ जया भारती व ॲड. प्रतिभा पारवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कारंजा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एड निलेश पाटील (कानकिरड ) यांनी मानले. या समारंभाचे यशस्वी नियोजन कारंजा येथील सह.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस एन पुंड यांनी केले. सहाय्यक अधीक्षक व्ही डब्ल्यू बेलखेडकर तसेच सार्व.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाशिम शुभम जोशी,कारंजा येथील सहा.कार्य.अभियंता प्रतीक इंगळे न्यायालयीन कर्मचारी , कारंजा विधीज्ञ मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यातील वकील मंडळी, विधीज्ञ मंडळाचे पदाधिकारी,.वाशिम जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी कर्मचारी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विविध विभागाचे मान्यवर अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. समारंभासाठी कारंजा शहर ,ग्रामीण व धनज पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील योगदान दिले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....