वाशिम : सद्यस्थितीत विदर्भ कलावंत संघटना व लोककलावंताच्या मागणीवरून शासनाने जिल्हाधिकारी यांना कलावंताचे मानधनाचे गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढण्याचे पत्र दिले होते.अखेर त्यानुसार जिल्हाधिकारी वाशिम यांनी अधिकारी वर्गाच्या दोन समित्या स्थापन करून,कलावंताना मुळ कागदपत्रे घेऊन दि 04 ते 10 मार्च पर्यंत सामाजिक न्याय भवन नालंदा नगर वाशिम येथे सादरीकरणाला बोलवीले आहे . मात्र यामध्ये महत्वाचे म्हणजे सध्या चालू वर्षाचे 2022 ते 24 पर्यंतच्या नविन कलावंतानाच मुळ फाईल घेऊन सादरीकरणाकरीता बोलविण्यात आलेले असून त्यापूर्वीच्या सन 2017, 2018, 2019, 2020, 2021 मध्ये मानधना करीता प्रस्ताव सादर केलेल्या गरजू व खऱ्याखुऱ्या हाडाच्या कलावंताना बोलविले नसल्यामुळे जुन्या कलावंतामधून कमालीचा आक्रोश व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतः जातीने लक्ष्य देऊन अगोदर जुन्या खऱ्याखुऱ्या कलावंताच्या प्रस्तावाकडे लक्ष्य वेधण्याची गरज असल्याचे मत विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केले असून तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर केले आहे . यावेळी संघटनेच्या पदाधिकारी कांताबाई लोखंडे, इंदिराबाई मात्रे तसेच कैलास हांडे, लोमेश चौधरी इत्यादी हजर होते.