इचुकाट्याच्या माध्यमातून हास्य प्रबोधनाचा जागर बाजार समितीच्या राजाच्या समोरच इचुकाटा या हास्य प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मित्र मंडळ कारंजा लाड यांच्यावतीने
करण्यात आले होते. त्यावेळी वरील आशयाची कविता डॉ.विजय काळे यांनी सादर केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मित्र मंडळ कारंजा लाड यांनी कारंजात इचुकाटा हास्य प्रबोधन कवी संमेलनाचे आयोजन बुधवार दि. २७-०९-२०२३ ला केले होते.कारंजे करांची अनेक दिवसांची मागणी होती ती या कार्यक्रमाने पूर्ण झाली.
कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मित्र मंडळ कारंजा लाड यांचे गणपती उत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे.पहिल्याच वर्षी अनेक चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन गणेशोत्सव मंडळाने केले होते. रात्री ८.०० वाजता शेतकरी निवास यार्ड क्र.०२ मंगरूळपीर रोड कारंजा (लाड) येथे बाजार समितीच्या राजासमोर सर्वांसाठी इचुकाटा या हास्य प्रबोधन कविसंमेलनाचे आयोजन केले होते.कविता गझल अभंग व एकपात्रीची धमाल या कवी संमेलनात इचुकाट्या वाल्यांनी केली. होती.सुप्रसिद्ध नाटककार साहित्यिक रमेशजी थोरात यांनी अनेक विनोदी किस्से व घर देता का घर हा एकपात्री प्रयोग दमदारपणे सादर केला.अमोल गोंडचवर यांनी काळजाची कोर ही कविता सादर करताच रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली व काही जणांच्या डोळ्यांच्या कडा सुद्धा ओल्या झाल्या.धीरज चावरे यांनी सादर केलेला फुटकं नशीब खूप खूप भाव खाऊन गेलं.त्यांच्या बायकोला मोबाईल घेऊन दिला या कवितेने विनोदाचा कहर केला.चार वर्षांच्या लहान बालकांपासून तर ८० वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्वांनीचं कवितेचा आस्वाद घेतला.डॉ.विजय काळे यांनी शेतकऱ्याची व्यथा आपल्या कवितांमधून मांडली. काम करणाऱ्या माणसाची व्यथा सांगतानाच त्यांच्या मुलांनी नेमकं कोणतं शिक्षण घ्यावं हे भाकरीचा मेळ या कवितेच्या माध्यमातून सांगितले.कविता सादरीकरण करताना डॉक्टरांचा आवेश पाहण्यासारखा होता.कीर्ती राऊत गोंडचवर यांनी कविता बायकोची व्यथा कवितेतून मांडताच रसिक श्रोते हसून हसून लोटपोट झाले.प्रवीण हटकर यांनी सादरीकरण करत अभंग व गझल सादर केल्या. त्यांच्या प्रेम कविता भाव खाऊन गेल्या. मालवडकर यांनी आपली विनोदी रचना यावेळी सादर केली.
या बहारदार कवी संमेलनाचे सूत्रसंचालन गोपाल खाडे व वैभव भिवरकर या दोघांनी मिळून या केले.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सईताई डहाके,कृषी उत्पन्न बाजार समिती परिवार व कारंजेकरानी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सईताई डहाके यांच्या हस्ते रमेश थोरात,गोपाल खाडे, वैभव भिवरकर,अमोल गोंडचवर, डॉ.विजय काळे,धीरज चावरे, प्रवीण हटकर कीर्ती गोंडचवर व मालवडकर कवींचा सत्कार करण्यात आला.