अकोला :'- चला हवा येऊ द्या' फेम सुप्रसिद्ध कवी व अभिनेते किशोर बळी यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाने अकोल्यात हास्याचे फवारे उडवले. 'सारं गाव मामाचं या विनोदी एकपात्री प्रयोगाचे आयोजन रविवारी, ६ जुलै २०२५ रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील बोली, पात्र आणि तऱ्हेवाईक स्वभाव असलेल्या व्यक्तिरेखांमधून बळी यांनी श्रोत्यांना अंतर्मुख करणारी आणि हसविणारी सादरीकरण शैली सादर केली. सादरीकरणात त्यांनी ग्रामीण जीवनातील विसंगतींवर मार्मिक विनोदाच्या माध्यमातून भाष्य केले. प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयास टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकरंग प्रस्तुत या नाट्यप्रयोगात खुसखुशीत संवाद, वेळोवेळी बदलणाऱ्या वेशभूषा आणि स्पष्ट, स्वच्छ विनोदीशैलीमुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विशेषता व-हाडी बोलीचा सहज वापर आणि ग्रामीण संस्कृतीतील बारकावे यामुळे हा प्रयोग अधिक प्रभावी ठरला. लोकरंग या सांस्कृतिक व कला मंचाने आयोजित केलेल्या किशोर बळी यांच्या या प्रयोगाने अकोल्यातील प्रेक्षकांना निखळ हास्याचा आनंद दिला आहे. अशा प्रकारच्या दर्जेदार प्रयोगांची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अकोल्यात अलीकडे स्थापन झालेल्या लोकरंग या संस्थेने किशोर बळी यांच्या एकपात्री प्रयोगाचे आयोजन केले होते. ही संस्था अकोल्यात रसिकांच्या मदतीने गाजलेल्या कार्यक्रमांचे सशुल्क आयोजन करणार असून दहा हजार अनामत आणि वार्षिक पाच हजार शुल्कात रसिकांना वर्षाला दोन व्यक्तींना पाच दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी दिली जाणार आहे, अशी माहिती आपल्या प्रस्ताविकात लोकरंग अध्यक्ष अनिल गावंडे यांनी दिली.
मान्यवरांची शाबासकी
किशोर बळी यांचा एकपात्री प्रयोग बघून त्याला आशीर्वाद देण्यासाठी अकोल्याच्या कला क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती. कलावंत दिलीप देशपांडे, कलावंत रमेश थोरात आणि हास्यजत्रा फेम कलावंत कुणाल मेश्राम यांनी सारे गाव मामाचं हा प्रयोग बघून किशोर बळी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत या अस्सल वऱ्हाडी प्रयोगाचा डंका सर्वत्र वाजेल अशी अपेक्षा व्यक्त केली. किशोर बळी यांच्या या प्रयोगासाठी खास मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरुणजी घाटोळे यांचा या समारंभात लोकरंगचे अध्यक्ष अनिल गावंडे आणि किशोर बळी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
हे रसिक मायबापांचे प्रेम
हा एकपात्री प्रयोग सादर करताना अकोलेकर रसिक मायबापानी जो अलोट गर्दी करीत प्रतिसाद दिला हे माझ्यावर त्यांनी केलेले ऋण आहे. याचे श्रेय नक्कीच सर्व चाहते आणि मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींचे आहे. ग्रामीण जीवनातील विसंगती टिपताना विनोद येतोच मात्र त्याच्या माध्यमातून प्रबोधनाचा संदेश सुद्धा जाईल याची काळजी घेण्यात आली आहे, या प्रयोगाने हुरूप वाढला आहे आता कलेचा हा घोडा चौखूर उधळेल याची खात्री असल्याची प्रतिक्रिया किशोर बळी यांनी या प्रयोगानंतर व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन लोकरंगचे सचिव ॲड.सुधाकर खुमकर यांनी केले.