गडचिरोली,(जिमाका)दि.22: गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहूल,नक्षलग्रस्त व हिवताप संवेदनशिल आहे.या जिल्हयात 12 तालुके असून संबंधीत तालुक्यामधील एटापल्ली,भामरागड,धानोरा,कोरची,अहेरी हे तालुके अतिशय दुर्गम कार्यक्षेत्र असून नदी,नाले,डोंगरदऱ्यांनी,पहाडांनी आच्छादलेले आहे.गडचिरोली जिल्हा लगत छत्तीसगड,जिल्हयातील आदिवासी व दुर्गम भागातील नागरिक हे जंगलात असलेल्या छोटया-छोटया गावामध्ये राहतात. यातील कित्येक गावाची लोकसंख्या फक्त 50 ते 90 असल्यामुळे गावात हिवतापाचे जरी 1 किंवा 2 रूग्ण असले तरी हिवतापाचा इन्डीकेटर व API हा 20 व त्यापेक्षा जास्त आढळतो.तसेच मान्सून कालावधीत 30 टक्के व त्यापेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटतो.त्यामुळे हिवतापाबाबत विचार केले असता, संपुर्ण महाराष्ट्रातील पी.एफ. मलेरीया 70 ते 75 टक्के रूग्ण हे फक्त गडचिरोली जिल्हयातील असतात.त्यामुळे जिल्हयाची भौगोलीक परिस्थिती अतिविशेष असल्यामुळे हिवताप निर्मुलन करण्याकरीता विशेष उपाययोजनांची आवश्यकता आहे.
या करीता दिनांक 17/02/2022 पासून गडचिरोली जिल्हयात विशेष हिवताप सामुदायीक सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. या शोध मोहिमेमध्ये 659 गावाची निवड करण्यात आली असून 659 गावातील आशावर्कर व 91 क्षेत्र कर्मचारी करुन सर्वेक्षणाचे काम सुरु आहे.हि मोहिम दिनांक 31/03/2022 पर्यंत राबविण्यात येणार असून दिनांक 14/03/2022 पर्यंत 220796 लोकसंख्येपैकी 120697 रक्तनमुने संकलीत केलेले आहे. हे प्रमाण 54.62 एवढे आहे. पैकी 6 रुग्ण पी.व्ही.प्रकारात व 9 रुग्ण पी.एफ. प्रकारामध्ये दुषित आढळून आले. त्या सर्वांना समुळ उपचार देण्यात आला व संबंधित रुग्णांची तपासणी करण्यात आली.
दिनांक 15/03/2022 ला उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य समिती गडचिरोली मनोहर पाटील पोरेटी यांचे अध्येक्षतेखाली आरोग्य समितीच्या सभेतील आढावा आणि हिवतापाच्या स्थितीबाबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी सविस्तर माहिती सांगितली. आरोग्य समितीच्या कार्यकारी मंडळाची मुदत दिनांक 20/03/2022 ला संपत असल्यामुळे हि आढावा सभा मनोहर पाटील पोरेटी यांचे अध्यक्षतेखाली होणारी शेवटची सभा असून दुर्गम आणि विस्ताराने मोठया असलेल्या या जिल्हयात आणि कोविड-19 च्या संकट काळातही आरोग्य विभागाने अतिउत्कृष्ट कार्य केल्या बद्दल मनोहर पाटील पोरेटी यांनी सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचे मनपुर्वक अभिनंदन केले, आणि असाच सेवाभाव यापुढेही सुरु ठेवावा असे मार्गदर्शनातून सांगितले.
जेष्ठ आरोग्य समिती सदस्य ॲड.रामभाऊ मेश्राम यांनी कोरोना माहामारीतही आरोग्य यंत्रनेने अतुलनिय केलेल्या कामाची प्रशंशा करीत आरोग्य विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांचे भरभरुन कौतुक केले. तत्पुर्वी आरोग्य विभाग जि.प. गडचिरोली च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी सर्व समिती सदस्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.