वाशिम : जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींसाठी संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शंकर महादेवन अकॅडमीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत या शाळेत विशेष संगीत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम संपूर्ण देशभरातील केवळ तीन शाळांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून निवडला गेला असून, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील मा.शा. झेडपी शाळा त्यातील एक मानाचा तुरा ठरली आहे.
या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना शास्त्रीय आणि आधुनिक संगीतातील मूलभूत तसेच प्रगत तंत्रांचे मार्गदर्शन दिले जात आहे. या उपक्रमाचा पहिला मोठा टप्पा १ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यावेळी या विद्यार्थीनी सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या समोर आपली कला सादर करणार आहेत.
या संधीबद्दल जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, "विद्यार्थिनींसाठी ही एक अभिमानाची आणि प्रेरणादायी संधी असून, त्यांना आत्मविश्वास आणि संगीतातील करिअरसाठी दिशादर्शन मिळेल," असे मत व्यक्त केले.
हा उपक्रम विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच, आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल आणि भविष्यात संगीताच्या क्षेत्रात नवी क्षितिजे खुली करेल. जिल्ह्याच्या झेडपी शाळेतील विद्यार्थिनी देशपातळीवर ओळख मिळवणार असल्याने या उपक्रमाबद्दल सर्वत्र उत्साह आणि कौतुकाची लाट उमटली आहे.