अकोला : नाल्याच्या काठावर असलेल्या प्राचीन दगडाची भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरात आज रविवारी सायंकाळी चार वाजातच्या सुमारास घडली. मरण पावलेले मजूर हे नाल्याचे बांधकाम करीत असताना अचानक नाल्याच्या काठावरील दगडाची भिंत कोसळली अन् त्याखाली दबल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान या घटने प्रकरणी मुर्तीजापुर शहर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या लक्कडगंज भागात एका मोठ्या नाल्याचं बांधाकाम मुर्तीजापूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान आज या नाल्याच्या बांधकामासाठी लकी लखन पचारे (वय २०), सागर नरेश सोळंखे (वय२४) आणि साबिर शहा मोहब्बद शहा (वय २७) हे तिघे आले होते. इथे सकाळपासूनच तिघांनी कामकाजाला सुरुवात केली. नाल्यात बांधकाम करत असताना अचानक काठावर असलेली दगडाची भिंत कोसळली.
एकही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही
परंतु या दुर्दैवी घटनेनंतर नगरपालिकेचे एकही अधिकारी घटनास्थळी आले नव्हते. कारण रविवार असल्यामुळे इथे कोणीही येऊन फिरकले नाही असे स्थानिक नागरिक सांगतात. दरम्यान दगडाची कोसळलेली भिंत ही इंग्रजकालीन होती. नाल्याचं खोदकाम केल्यामुळे ही भिंत खिळखिळी झाली होती. त्यामुळेच दगडाची भिंत कोसळली असावी असा अंदाज आहे.