महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आहेत. त्यात कोल्हापूरची श्री महालक्ष्मी पहिले शक्तीपीठ, माहूरगडची श्री रेणुका माता हे दुसरे शक्तीपीठ तर तुळजापूरची श्री तुळजाभवानी हे तिसरे शक्तीपीठ आणि सप्तशृंगगडची देवी श्री सप्तशृंग देवी हे अर्धेपीठ संबोधले जाते.
१) श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरः-
उत्तर काशीमधून अगस्ती ऋषी क्रोधाने बाहेर पडले. दुःखामुळे ते प्रवास करताना मूरच्छा येऊ लागली म्हणून त्यांनी शंकराची प्रार्थना केली. सध्या मला काशीला जाणे शक्य नाही म्हणून तुमचे वास्तव्य असलेले स्थान मला सांगा. शंकराने साक्षात्कार करून ही कुरवीरनगरी, कोल्हापूर दाखविले म्हणजेच हीच दक्षिण काशी होय.
श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती रत्नशिलेची आहे. मूर्तीचे वजन ४० किलो आहे. मूर्ती दगडी चबुतरावर उभी आहे. हातात पानपात्र असून मस्तकावर मुकुट व शेषाची छाया आहे. मंदिराचे आवारात सात दीपमाळ आहे. येथे पाच प्रमुख मंदिरे आहेत. सभोवताल लहान मूर्ती व उपदेवालये आहेत. मंदिर हेमांडपंथी बांधलेले आहे. समोरील सभामंडपाला गरुडमंडप म्हणतात. मंदिराच्या सभोवती २५० लहान मंदिरे असून कोल्हापूरात ३००० मंदिरे आहेत. ही देवी अनेकांची कुलस्वामिनी आहे.
२) माहूरगडची श्री रेणुका माताः-
माहूरगड निवासिनी श्री रेणुकादेवी किनवट तालुका जिल्हा नांदेड येथील हे स्थान डोंगर पठारावर असून श्री अनुसया व श्री दत्तात्रयाचे निवासस्थान आहे. एकदा जमदग्नी ऋषी आश्रमात ध्यानस्थ बसले होते. त्रासेनजित राजाने कन्याकामेष्ठी यज्ञ केला होता. त्यातून रेणुकेने जन्म घेतला. रेणुकेने ऋषी जमदग्नीला पती म्हणून पसंद केले. ती ऋषी पत्नी झाली. रेणुकेला रुमावंत, सुवेण, वसू, विश्वास आणि परशुराम अशी मुले झाली. रेणुका रोज नदीवरुन पाणी घेऊन येत असे. एकदा स्वर्गस्त गंधर्व आणि अप्सरा नदीत जलक्रीडा करताना पाहून ते बघण्यात तिचा वेळ गेला . तिला आश्रमात यायला उशीर झाला. जमदग्नी ऋषीला क्रोध आला. त्यांनी आपल्या मुलांना मातेला देहदंडाची शिक्षा देण्यास सांगितले परंतु चारही मुलांनी हे करण्यास नकार दिला. शेवटी परशुरामाने वडिलांची आज्ञा पाळली. आईचे शिर धडावेगळे केले. जमदग्नी प्रसन्न होवून परशुरामाला वर माग म्हणाले. तेव्हा परशुराम म्हणाले, पुन्हा माझी आई रेणुकेला जीवंत करा. ऋषीने रेणुकेला जीवंत केले. दैत्य राजा सहस्त्राजुन हा अत्यंत उन्नत होता. त्याला माहित होते की, जमदग्नी ऋषीकडे कामधेनू गाय आहे. या दैत्य राजाला कामधेनू गाईचा मोह झाला. राजाने परशुराम घरी नाही हे पाहून जमदग्नी ऋषीला ठार केले आणि कामधेनू गाय घेऊन पसार झाला. जमदग्नीला अग्नी देण्यासाठी कोरी जागा परशुरामाला हवी होती. परशुरामाने एका पारड्यात आई रेणुकेला बसविले आणि दुसऱ्या पारड्यात जमदग्नीचे शव ठेवले. परशुराम फिरत फिरत माहूरगडावर आला. तेथे दत्तात्रयाचे वास्तव्य होते. दत्तात्रयांनी त्याला कोरी भूमी दाखविली. तिथेच पित्याचा अग्नीसंस्कार केला. रेणुका पतीसह सती गेली. परशुरामाने प्रथम बाण मारुन मातृतीर्थ व सर्वतीर्थ तयार केले आणि त्या पाण्याने परशुरामाने आंघोळ करुन अग्नी दिली.
काही दिवसांनी परशुरामाला आई रेणुकेची आठवण आली. परशुराम अतिशय शोकाकुल झाला. त्याचवेळी आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू समोर चालत रहा, मागे पाहू नकोस. परशुराम खूप आतुर झाला त्याने मागे पाहिले. रेणुका मातेचे फक्त मुखच बाहेर आले. मातेच्या तांदुळरुपातल्या मुखाची माहूर गडावर पूजा होते. परशुराम यांनी आईचे मुख पाहिले म्हणून त्याला "मातापूर" असे नाव पडले.
३) तुळजापूरची श्री तुळजाभवानीः-
शिवाजी महाराजांना भवानी तलवार देणारी माता म्हणजे तुळजाभवानी. सोलापूर जवळ बालाघाट डोंगराच्या पठारावर भवानी वसली आहे. कृतयुगाच्या काळात दंडकारण्यातील दिंडीर वनाच्या सिमेवरील निसर्गरम्य तपोभूमित कर्दम नावाचा ऋषी राहत होता. त्याची पत्नी सुशील व रुपसुंदर होती. त्यांना एक पुत्र झाला. दुदैवाने तिला वैधत्व प्राप्त झाले. ऋषी पत्नीला अति दुःख झाले. मंदाकिनी नदीच्या तिरावर तिने तप केले. एक कुकर नावाच्या राक्षसाची तिच्यावर दृष्टी गेली. तिला त्याने स्पर्श केला व तिची समाधी भंगली. तिने जगदंबेला हाक मारली. जगदंबा धावून आली आणि कुकर राक्षसासोबत युद्ध केले. या राक्षसाने महिषाचे रुप घेतले होते. तुळजाभवानीने महिषासूराचा वध केला. हाकेला धावून येणारी म्हणून तुळजाभवानी हे नाव प्राप्त झाले.
तुळजाभवानी सोलापूर पासून ४६ किमी आहे. येथे गेल्यावर प्रथम नारदाचे मूर्तीचे दर्शन होते. डाव्या हाताला पुष्पकर्णी म्हणजेच कल्लोळ तीर्थ लागते. तिथेच समोर गोमुख तीर्थ नजरेत पडते. उजव्या हाताला गणेश मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर आहे. उंच सिंहासनावर आई भवानीची देखणी मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या शाळीग्राम शिळेची असून सिंहवाहिनी आहे. अष्टभूज असून तिने पायाखाली महिषासूराचे शव घेतले. त्याचे शिर डाव्या हातात शेंडी पकडून धरले आहे. उजव्या हाताने त्रिशुल त्याचे छातीत खुपसलेले आहे. एकदा प्रतिष्ठापना केलेली मूर्ती हलवितात. नवरात्रापूर्वी कृष्ण पक्षाच्या कालाष्टमीला तुळजाभवानीची मूर्ती शेजगृहात निद्रेसाठी हलविण्यात येते. वर्षात तीनवेळा देवी निद्रा घेते. भाद्रपद अष्टमी ते अमावश्या, आश्विन शुद्ध एकादशी ते पोर्णिमा, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी असे देवीचे तीन निद्राकाळ आहे. ही भवानी माता भक्तांना सौख्य, आनंद, वैभव देणारी असून पराक्रमी पुरुषांना सामर्थ्य देणारी आहे.
४) सप्तशृंगीगडची श्री सप्तशृंगी देवीः-
सप्तशृंगगड, वणी नाशिक जिल्ह्यात उत्तरेस ४३ किमी अंतरावर चांदवड डोंगराच्या रांगेत आहे. इंद्रायणी, कार्तिकेयी, वाराही, वैष्णवी, शिवा. चामुंडा, नरसिंह आणि सप्तशृंग या सात देवता सात शिखरावर वास्तव्य करून आहेत. या गडाच्या पायथ्याशी वणी गाव आहे. त्यामुळे सप्तशृंगी मातेला वणीची देवी असेही म्हणतात. ४५९ दगडी पायऱ्या चढल्यावर प्रथम गणेशकुंड, नंतर देवीची भव्य मूर्ती दिसते. पहाडामध्ये देवीची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती १०-१२ फूट उंच असून तिला १८ हात आहेत. माणिक, माल, कमल, बाण, धनुष्य, खःडग, वज्र, गदा, चक्र, त्रिशुल, कुर्हाड, शंख, दंड, घंटा, ढाल, धनुष्यबाण, तलवार व कमंडलू अशी विविध आयुधे प्रत्येक हातात आहे. ही मूर्ती शेंदूरी रक्तवर्णी आहे. मूर्तीचे तेजस्वी डोळे दृष्टांचा थरकाप उडवितात. या देवीची दिवसातून तीनवेळ तीन रुपे दिसतात. सकाळी बालिका, दुपारी तरुण, संध्याकाळी वृद्ध दिसते. हे सप्तशृंगीचे शिखर ४७५५ फूट उंच आहे. हे नाथ संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व संत निवृत्तीनाथ, समर्थ रमदास, शिवाजी महाराज यांनी या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्याची नोंद आहे.
पुरुषोत्तम बैसकार मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....