मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विदर्भ दौर्या करिता आज (रविवारी) नागपुरात रेल्वेने आगमन झाले. राज ठाकरे यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. विदर्भ एक्सप्रेसने सकाळी 8.30 वाजता त्यांचे मुख्य रेल्वेस्थानकावर आगमन झाले.
राज ठाकरे सुमारे 15 वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर मनसेची स्थापना झाल्यानंतर जून 2006 मध्ये दौरा केला होता. 2019 मध्ये वणीला प्रचार दौऱ्यावर आले होते. तर 2014 मध्येही दौरा केला होता. मात्र त्यानंतर प्रथमच विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. राज ठाकरे यांचा दौरा नव्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याचेही बोलले जात आहे. विदर्भातील मनसे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यासोबतच आघाडीला धक्का देण्याची तयारी ठाकरे यांनी केल्याचे सांगितले जाते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप-मनसे युती होणार की नाही, याबाबत संभ्रम असला तरी आगामी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढल्यास किती बळ मिळेल याची चाचपणी केली जाणार आहे. चंद्रपूर आणि अमरावती या महानगरपालिकांच्याही निवडणुका मनसे पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांचाही दौरा करणार आहेत. या दौऱ्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते चर्चा करणार आहेत.