भाऊबीज हा हिंदू धर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध व्दितीया (यम द्वितीया) यादिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीचा पाचवा दिवस असतो. या सणांस हिंदीत भाईदूज असेही म्हणतात.
या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहिण प्रथम चंद्रकोरीस ओवाळते, मग भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळीचे ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो.
या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यम द्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात. असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहीणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखविण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले, तेव्हा पासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची असते.
या दिवशी भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते. त्याला प्रेमाचा टिळा लावते. तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेम भावना व्यक्त करीत असतो. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा, हा या मागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्ति प्रमाणे पैसे, कापड, दागिना असे वस्तू ओवाळणीत टाकतो. अशी भाऊबीज सणाची आख्यायिका आहे.
बंधू भगिनीचा प्रेम संवर्धनाचा हा दिवस आहे. समाजातील सर्व भगिनींचा समाज व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्याचे स्वागत करतील, त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरु शकतील. हा प्रण करून त्याप्रमाणे वागण्याचा हा दिवस आहे.
बहिणीचे असते भावावर अतूट माया
मिळो त्याला अशीच प्रेमाची छाया
भावाची असते बहिणीला साथ
मदतीला देतो ना मीच हात
ग्रामगीतेतील भाऊबीज महत्त्व--
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील सण-उत्सव या अध्यायात भाऊबीजेचे महत्त्व पटवून देतात.
आनंद उसळावा घरोघरी ।
सुखी गायी, वासरे, नर-नारी ।
भाऊ-बहीणींचे परोपरी ।
नाते वाढे ऐसे व्हावे ।।
दिवाळी सण आला म्हणजे घरोघरी आनंदाला उधाण येते. घरचे स्त्री - पुरुषच नव्हे तर गायी, वासरे सुद्धा आनंदाने हंबरली पाहिजेत. प्रत्येक मुलांमुलींनी परस्परात भाऊ-बहिणीचे नाते वाढवावे. हे नाते आज फार गरजेचे आहे.
बंधुभाव, भगिनीपण ।
हे नाते ओसरले समाजातून ।
ते वाढाया नव्या पिढीत पूर्ण ।
योजना भाऊबीजेची ।।
आज समाजात स्त्री अत्याचार बोकाळत चालला आहे. परस्त्री आपण बहीण व आईसमान मानावी. समाजातून बंधुभाव, भगिनीभाव कमी झाला आहे. नव्या पिढीत या भावना जोर धरतील, असे प्रसंग घडवून आणावेत. जयगुरु !
शब्दांकन:-
लेखक पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....