गडचिरोली:-चामोर्शी तालुक्यातील तुमडी जंगल परिसरात शोधमोहीम राबवून दारू विक्रेत्यांचा ८ हजार रुपयांचा मोहफुलाचा सडवा मुक्तिपथ व गाव संघटनेने संयुक्तरित्या कारवाई करून मंगळवारी नष्ट केला. तुमडी हे गाव दारू विक्रीसाठी कुप्रसिद्ध होते. शेजारील जवळपास सात गावातील मद्यपी या गावामध्ये दारू पिण्यासाठी येत असायचे.
अशातच गाव संघटनेने दारू विक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याची तंबी दिली. काही काळ या गावातील अवैध दारू विक्री बंद होती. मात्र, गावातील काही विक्रेत्यांनी जंगल परिसराचा आधार घेऊन चोरट्या मार्गाने आपला अवैध व्यवसाय सुरू केला. अशातच मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या सदस्यांनी संयुक्तरित्या पुन्हा दारू विक्रेत्यांना नोटीस बजावून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. सोबतच जंगल परिसरात अहिंसक कृती करीत हातभट्ट्या व दाख विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी टाकलेला मोहफुलाचा सडवा नष्ट केला.