वाशिम - शहरातील पंचशिलनगर नजीक असलेल्या कोठेकरवाडी येथे सोमवार, २३ ऑक्टोंबर रोजी पडघान यांच्या निवासस्थानी सापडलेल्या ५ फुटाच्या बिनविषारी धामण जातीच्या सापाला सर्पमित्र भूषण राऊत व ओम गायकवाड यांनी शिताफीने पकडून तपोवन येथील नैसर्गीक अधिवासात सुरक्षितपणे सोडले. सर्पमित्राच्या या कामगिरीमुळे दिवसेंदिवस नामशेष होत असलेल्या व मानवासाठी उपकारक असलेल्या धामण सापाला जिवदान मिळाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, वायरमन म्हणून काम करणारे गजानन पडघान हे कोठेकर वाडी येथे राहतात. २३ च्या दुपारी ते आपल्या घरात आराम करत असतांना त्यांच्या पायावरुन काहीतरी सरपटत गेल्याचे दिसले. त्यांनी उठून पाहीले असता साप सरपटत घरात जात असतांना त्यांना दिसला. त्यांनी लगेच ही बाब गजानन पडघान या आपल्या मुलाला सांगीतली. त्यांनी सुराळा येथील सर्पमित्र भूषण राऊत यांनी सांगून साप पकडण्याची विनंती केली. सर्पमित्रांनी लगेच पडघान यांचे घर गाठत टेबलखाली लपलेल्या धामण जातीच्या ५ फुट लांबीच्या सापाला शिताफीने पकडले व प्लॉस्टीकच्या भरणीत बंद केले. यादरम्यान साप निघाल्याची वार्ता कळताच परिसरात गर्दी झाली होती. सर्पमित्र राऊत यांनी या सापाला तपोवन येथील नैसर्गीक अधिवासात सुरक्षितपणे सोडले. व परिसरातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र भूषण राऊत हे गेल्या ३ वर्षापासून साप पकडण्याचे कार्य निशुल्क करत असून आतापर्यत त्यांनी जवळपास २५० सापांना जिवदान दिले आहे. अत्यंत दुर्मिळ व विषारी असलेले वाळा आणि फुरसे हे सापही त्यांनी पकडून जीवदान दिल्याची त्यांच्याकडे नोंद आहे.
---------
साप मानवासाठी उपकारक; सापाला मारु नये - सर्पमित्र भूषण राऊत
धामण जातीचा हा साप बिनविषारी असून मानवाला या सापापासून कोणताही धोका नाही. नाग, मण्यार, घोणस फुरसे हे चारच जातीचे साप विषारी असून बाकीचे बिनविषारी आहेत. कोणताही सर्प हा विनाकारण मनुष्याला दंश करत नाही. मात्र मनुष्य साप दिसला रे दिसला की त्याला मारतो. मात्र निसर्गाच्या चक्रातील एक मुख्य घटक असलेला सर्प हा मानवासाठी उपकारक असून कुणीही सापाला न मारता सर्पमित्राला बोलावून त्यांना जिवनदान द्यावे.