वाशिम, दि. १३ जून जिल्ह्यातील प्रगतशील व प्रलंबित विकासकामांना गती देवून ती वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी संबंधित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आज दि.१३ जुन रोजी पार पडलेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. घुगे बोलत होते.
या बैठकीत आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,जलजीवन मिशन, नळ योजना, महिला व बाल विकास, महावितरण,मेडा, समाज कल्याण, उपप्रादेशिक परिवहन विभाग,आरोग्य व स्वच्छता आदी योजनांची अंमलबजावणी, तसेच महसूल व वसुली प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही योजनांची प्रगती समाधानकारक नसल्याचे लक्षात आल्याने, प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत, असे निर्देश श्री. घुगे यांनी दिले.
प्रगतशील कामे अर्धवट न राहता पूर्णत्वास जावी आणि त्याचा थेट लाभ जनतेला मिळावा, हीच शासनाची अपेक्षा आहे," असेही ते यावेळी म्हणाले. अहवाल सादर करून जबाबदारी टाळण्याची पद्धत आता थांबवावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी आकाश वर्मा, महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, सहाय्यक नियोजन अधिकारी संजय राठोड, अधीक्षक भूमी अभिलेख श्रीकांत मुंढे यांच्यासह सर्व तहसीलदार, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध योजनांच्या अडचणी, निधी वितरण, लोकसहभाग आणि विभागीय समन्वय यावरही चर्चा झाली. प्रशासनातील प्रत्येक यंत्रणेने आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडून, "फक्त फायली फिरवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम दिसावे, अशा शब्दांत श्री. घुगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कामकाजातील परिणामकारकतेवर भर देण्याचे आवाहन केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....