नाशिक: इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. १५ जानेवारीपासून बेपत्ता असल्याने इगतपुरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हा युवक मृत अवस्थेत विहिरीत आढळून आला असून क्रेनच्या सहाय्याने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील युवक भूषण गणेश भागडे वय २३ हा १५ जानेवारीपासून बेपत्ता झाल्याबाबत त्याच्या वडीलांनी इगतपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नांदगाव सदो गावाजवळ आज सकाळी समृद्धी महामार्ग भागातील एका विहिरीत हा युवक मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली पोलिसांनी विहीरीतून त्याचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढला असून याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
युवकाने आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी या घटनेबाबत इगतपुरी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरील मजुरी कामाला जातो असे सांगून भूषण घरातून बाहेर पडला. मात्र नंतर तो घरी परतला नाही म्हणून वडील गणेश पांडुरंग भागडे यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार इगतपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी भूषणचे लग्न देखील जमले होते. १५ जानेवारीपासून भूषण बेपत्ता असल्याने कुटुंबाकडून त्याची चिंता केली जात होती.
दरम्यान, त्याचा मृतदेह सापडल्याने इगतपुरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. भूषण बागडे यांच्या मृत्यू संदर्भात अद्यापही खरे कारण समोर आलेले नाही. याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू असून इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर भूषणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.