चंद्रपूर दि. 1 एप्रिल: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक खत बाजारात पुरेसा कच्चामाल उपलब्ध होणार नसल्याने खरीप हंगाम-2022 मध्ये खत तुटवडा होण्याची शक्यता असून खताच्या किमंती वाढण्याची दाट शक्यता आहे. भारत सर्वाधिक खतांचे आयात करणारा देश असून युद्धजन्य परिस्थितीचा देशाच्या रासायनिक खत पुरवठ्यास फटका बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील रासायनिक खतांच्या उपलब्ध साठ्यामध्ये युरिया 12577 मे.टन, डीएपी 2847 मे.टन, एमओपी 309 मे.टन, एनपीके 10029 मे.टन, एस.एस.पी 9980 मे.टन असे एकूण 35,742 मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. सद्यस्थितीत बाजारात मुबलक प्रमाणात खतसाठा उपलब्ध असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांनी खतांचा आवश्यक साठा करून ठेवावा. जेणेकरून रशिया व यूक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्य असेल तेवढी पिकांच्या गरजेनुसार व पेरणी खाली येणार या क्षेत्राचा विचार करून आवश्यक खत खरेदी करून ठेवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांनी केले आहे.