वाशिम: श्रमिकांसाठी ज्यांचा शब्द तलवार होई, वंचित-शोषित-उपेक्षितांसाठी ज्यांच्या लेखणीतून ठिणग्या बरसत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी शाहीर अमर शेख इत्यादींच्या साथीने मराठी मनांमध्ये विचारांचे स्फुल्लिंग चेतविले आणि ज्यांचे शब्दच "फकिरा" होऊन लोकप्रबोधनाच्या चळवळीत पेर्ते झाले. ज्यांच्या साहित्याने परिवर्तनाला दिशा व चालना दिली. त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचे तब्बल आठ खंड छापून तयार असूनही, केवळ मंत्रिमहोदयांना वेळ नसल्याने, प्रकाशनाअभावी सरकार दरबारी कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. सत्ताधीशांची ही बेपवाई आणि उदासीनता पाहून अण्णाभाऊंच्या त्या खंडांच्याही जिवाची काहिली होत असावी.
महाराष्ट्र शासनाच्या "अण्णाभाऊ साठे चरित्रे साधने प्रकाशन समिती"च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचे ८ खंड अथक परिश्रमातून अनेक महिन्यांपूर्वी सिद्ध झाले. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे ६ खंड आणि कथांचे २ खंड यांचा त्यात समावेश आहे. सर्वसामान्य वाचकांच्या खिशाला परवडावे व अल्पदरात अण्णाभाऊंचे मौलिक साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे, या हेतूने या आठही खंडांची किंमत प्रत्येकी केवळ ६० रुपये ठेव्ली आहे. परंतु उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना प्रकाशनासाठी वेळच मिळत नसल्याने हे समग्र साहित्य शासनाच्या गोदामात गट्ट्यांमध्ये धूळखात पडून आहेत. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १ ऑगस्ट २०२३ रोजीच्या पुणे दौऱ्यात पंतप्रधानांच्याच हस्ते खंडांचे प्रकाशन करण्याचा विचार पुढे आल्यानंतर समिती सदस्यानी धावाधाव करून सर्वच खंडांवर अखेरची नजर फिरवीत २५ जुलै २०२३ रोजीच सर्व खंडउ च्च शिक्षण विभागाच्या संचालकांकडे सुपूर्द केले. परंतु मोदीजींच्या हस्ते प्रकाशनाचा तो वेत बारगळला. प्रकाशन आतापर्यंत या ना त्या कारणाने रेंगाळत गेले.या खंडांच्या प्रकाशन समितीचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष असून प्रा. डॉ. संजय शिंदे, औरंगाबाद हे सदस्य सचिव आहेत. अन्य सदस्यांमध डॉ. शरद गायकवाड (कोल्हापूर), ए. बी. अंभोरे (अमरावती), प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर (लातूर), प्राचार्य डॉ. बी. एन. गायकवाड (मुंबई), डॉ. सोमनाथ कदम (कणकवली), डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड), सचिन साठे (वाटेगाव), डॉ. मिलिंद कसवे (नारायणगाव, पुणे), डॉ. देवकुमार अहिरे (पुणे), शिवा कांबळे (नांदेड), डॉ. प्रमोद गोराडे (अमरावती), डॉ. विजय कुमठेकर (जालना) आणि मल्लिका अमर शेख (मुंबई) यांचा समावेश आहे.
मंत्र्यांना वेळच नाही; गादेकर यांची खंत
समिती सचिव डॉ. संजय शिंदे हे वारंवार संबंधित मंत्र्यांना वेळेची आठवण करून देतात. परंतु मंत्रिमहोदयांना प्रकाशनासाठी वेळच मिळत नसल्याबद्दल समिती सदस्य डॉ. माधवराव गादेकर यांनी खंत व्यक्त केली. या प्रत्येक खंडाच्या १० हजार प्रती असून, सर्व आठ खंडांच्या मिळून लाखो रुपये किमतीच्या ऐशी हजार प्रती शासकीय गोदामात पडून आहेत. एक क्रांतिकारी वादळ सरकारी वखारीत घुसमट सहन करीत सुतळ्यांमध्ये बांधले जाऊन खितपत पडले आहे