कारंजा (लाड) : संत पुंडलिक बाबा यांच्या पवित्र पुण्यतिथी निमित्ताने,कारंजा येथील संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद सांस्कृतिक विभाग आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे पदाधिकारी संजय कडोळे, प्रदिप वानखडे, गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी कारंजा येथील वारकऱ्यांनी कारंजा ते मुर्तिजापूर पर्यंत "माऊलीची वारी" करून श्री विठु माऊली, संत पुंडलिक बाबा गादी दर्शन, जगत्जननी दुर्गादेवी, शिवमंदिर, श्रीरामदूत हनुमंत तसेच संत पुंडलीक बाबांच्या समाधी पादुकांचे दर्शन घेतले. या संदर्भात वृत्त असे की,संत परंपरेतील अलीकडे मुर्तिजापूर तालुक्यातील काटेपूर्णा नदीतीरावर असलेल्या जन्मभूमी श्रीक्षेत्र गोरेगाव येथील संत पुंडलीक बाबा गुरु मुंगसाजी भगवान यांनी आयुष्यभर मनुष्य प्राण्याला पर्यावरण वाचविण्याकरीता वृक्ष,वेली,रोपे लावण्याचा संदेश देऊन,आरोग्य रक्षणासाठी पुदीना व तत्सम वनस्पती औषधी खाण्याचा सल्ला दिला.त्या शिवाय सुखकर जीवन जगण्यासाठी,सृष्टी निर्मात्या देवधर्मापुढे नतमस्तक होऊन शिव आराधना,शक्ती म्हणजे दुर्गादेवीची भक्ती, रामदूत हनुमंताची उपासना करून धर्म आणि आध्यात्म्याला महत्व देण्याचे संकेत देवून आपल्यावर अनंत उपकार केले आहेत.अशा संतश्रेष्ठ ठरलेल्या वैराग्यमूर्ती परमहंस संत पुंडलीक बाबांना त्यांच्या भक्त गणांनी,गोरेगाव या खेडेगावातून मुर्तिजापूर जवळच्या सिरसो येथील शेत शिवारात संत पुंडलिक नगर ची स्थापना करून त्याठिकाणी आणले. या ठिकाणी बाबाच्या भक्तांनी त्यांना शेतजमीन दान देवून आश्रम बांधून दिला होता. या ठिकाणी संत पुंडलिक बाबा आयुष्यभर राहीले. व पुढे बाबाच्या निर्वाणानंतर त्यांनी दाखदिलेल्या जागेवरच बाबांना समाधी देण्यात आली.आश्चर्य म्हणजे बाबांच्या निर्वाणानंतर जगत्जननी दुर्गामातेच्या डोळ्यातून अश्रूंच्या गंगाजमुना वाहील्या आणि संपूर्ण मुर्तिजापूर सह पंचक्रोशीतील भाविकांना त्याची प्रचिती आली होती. आजही बाबांचे दर्शन येथे भक्तांना वारंवार होतच असते. व बाबांच्या स्मरणमात्राने भाविकांचे दुःख विघ्न हरण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.अशी माहिती संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद सांस्कृतिक विभागाचे कारंजा तालुका प्रमुख संजय कडोळे यांनी दिली आहे.