ब्रह्मपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता प्रमुख दोनच पक्ष समोरासमोर आहेत. माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसकडून संपूर्ण १७ तर माजी आमदार अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनात भाजपकडूनही १७ उमेदवार रिंगणात आहेत. इतर एका गटाकडून केवळ चार जागांवर उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार क्षेत्र मतदारसंघातून ओबीसी राखीव गटातून माजी सभापती प्रभाकर सेलोकर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित १० जगांकरिता निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी व अडते मतदारसंघातून २ तर हमाल व मापारी मतदारसंघातून केवळ १ जागा आहे.भाजपकडून शेतकरी परिवर्तन पॅनल निर्माण करण्यात आले असून, यात भाजप, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय, खरीप व गवई गटाची युती आहे. तर काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल निर्माण करण्यात आले आहे. दोन्हीकडून प्रत्येक मतदारसंघातील संपूर्ण १७ जागा लढविण्यात येत आहेत. तर एकता शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये वंचित बहुजन आघाडी, शिवसेना ठाकरे गट, बीआरएसपी, बीएसपी, संभाजी ब्रिगेड यांचा समावेश असून, ग्रामपंचायत मतदारसंघातून २ तर सहकारी संस्था मतदारसंघातून २ जागांवर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे काँग्रेस भाजप अशी थेट लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.