वाशिम (जिल्हा प्रतिनिधी सजय कडोळे) : सुपोषित भारत, कुपोषणमुक्त भारत या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारीत शासनाच्या विविध विभागामध्ये अभिसरण पध्दतीने पोषण अभियान कार्यक्रम देशपातळीवर राबविण्यात येत आहे. पोषण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग असणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन अंगणवाडी सेवा लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविता येतील. उदिष्टे साध्य करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, वाशिम अंतर्गत वाशिम तालुक्यात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२३ हा संपुर्ण महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पोषण अभियानामध्ये पोषण रॅली काढणे, गणेश उत्सवामध्ये देखाव्याचे बॅनर लावणे, पोषक वाटीका तयार करणे, घरोघरी योग अभियान, गरोदर स्त्रियांची अॅनिमिया तपासणी, कुटूंबाचे समुपदेशन करणे, आहारापट व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती, गरोदर स्तनदा, ६ वर्षाच्या आतील बालकांसाठी व किशोरी मुलींसाठी अॅनिमिया चेकअप कॅम्प, आहाराबाबत समुपदेशन करणे, आजाराबाबत मार्गदर्शन करणे, कुपोषण रोखण्यासाठी आयुष संदर्भातील विविध उपक्रम, पौष्टीक आहार पाककृती प्रदर्शन, किशोरवयीन मुलींकरीता मासिक पाळी मार्गदर्शन करणे असे विविध उपक्रम १ ते ३० सप्टेंबर 2023 दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय (ग्रामीण) च्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिली.