गडचिरोली,ता.८: देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे यांनी आज संध्याकाळपासून मासोळीतून दम्याचे औषध देण्यास प्रारंभ केला. लाखो रुग्णांनी या औषधाचा लाभ घेतला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, खा. अशोक नेते, माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार, आ.कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, काँगेस नेते जेसा मोटवानी, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रुग्णांना औषध वितरण करण्यात आले. वैद्यराज प्रल्हाद कावळे हे दरवर्षी मृग नक्षत्राच्या दिवशी दमा आजाराच्या रुग्णांना गणी आणि भुरभुसा या मासोळ्यांमधून औषध देतात. दरवर्षी हा कार्यक्रम कोकडी या गावी होत होता. परंतु यंदा देसाईगंज येथील आदर्श विद्यालयाच्या पटांगणावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आज संध्याकाळी ६ वाजतापासून औषध वितरणास सुरुवात झाली असून, ९ जूनच्या सकाळी ६ वाजतापर्यंत वितरण सुरु राहणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांसह छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा व अन्य राज्यातून लाखो रुग्ण औषधाचा लाभ घेण्यासाठी आले होते. कोकडी येथील गावकरी आणि स्वयंसेवकांनी वैद्यराज कावळे यांना मासोळ्या गोळा करणे तसेच त्यांच्यात औषध भरण्यासाठी मदत केली. आम आदमी पक्षाने रुग्णांसाठी पेयजलाची व्यवस्था केली होती. अन्य पक्ष आणि संघटनाही मदतीसाठी सरसावल्या होत्या.