अकोला:-महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित, अविनाश आहले निर्मित बहुचर्चित मराठी चित्रपट "एक राधा एक मीरा"मधील एक नायिका सुरभी भोसले ही राजकीय-सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेली आणि एका पक्षाची पदाधिकारी असलेली अभिनेत्री आहे. डेन्टीस्ट्री अर्थात दंतचिकीत्सेमधील पदावीचे शिक्षण घेत असताना अभिनयाच्या क्षेत्रात संधी मिळायला केवळ एक वर्ष वाट पहायची असे ठरवून आलेल्या सुरभीला "एक राधा एक मीरा"मिळाला आणि तिचे या क्षेत्रात पदार्पण झाले आहे. आपले आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटात एखादी छान भूमिकेत काम करायचे आहे.
आहालेज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या म्युझिकल लव्हस्टोरीमध्ये गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, संदीप पाठक, मेधा मांजरेकर आणि इतर आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत. महेश मांजरेकर यांच्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तो ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
सातारा येथील सामाजिक, राजकीय आणि चित्रपटाची पार्श्वभूमी असलेल्या भोसले कुटुंबाची सुरभी ही सदस्य आहे. तिच्या आईचे वडील डॅडी देशमुख यांनी "राघूमैना" आणि "देवकी नंदन गोपाळा" या चित्रपटांची निर्मिती केली होती. सुरभीचे आजोबा प्रतापराव भोसले हे खासदार आणि ग्रामविकास मंत्री, प्रदेशाध्यक्ष होते तर वडील वाई-महाबळेश्वरचे आमदार होते आणि 18 वर्ष सहकार क्षेत्रात उत्तम काम केलेले आहे. स्वतः सुरभी भाजपची सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष आहे. त्याशिवाय ती वाई-खंडाला विधानसभा निवडणूक प्रमुख आहे.
अशी ही सातारची मुलगी "एक राधा एक मीरा"मध्ये मध्यवर्ती भूमिकेत चमकते आहे. “हा चित्रपट म्हणजे कलाक्षेत्रातल्या अनेक गोष्टी शिकण्याची एक संधी होती. महेश सरांबरोबर काम करायला मिळाले हे भाग्यच होते कारण त्यांनी अनेक बारकावे सांगितले. गश्मीर, मृण्मयी, मेधाताई, संदीप पाठक या सगळ्यांकडून काही ना काही मी शिकले. प्रसंगी मी महेश सरांचा ओरडाही खाल्ला, पण तो माझ्या भल्यासाठी होता,” ती म्हणते.
तिला हा रोल कसा मिळाला याबबत बोलताना ती म्हणाली की "देऊळ बंद" चित्रपटासाठी तिने ऑडीशन दिली होती आणि त्या चित्रपटात महेश मांजरेकर होते. “त्यांचा मग या चित्रपटासाठी मला फोन आला. यातील सान्वीची भूमिका तुला करायची आहे, असे त्यांनी मला सांगितले. मी त्यांना विचारले की, सर ऑडिशन किंवा लुक टेस्ट घेणार ना? तर ते म्हणाले "मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की, तु हा रोल उत्तम निभावशील."मी मनाशी खुणगाठ बांधली की महेशसरांचा चित्रपट आहे तर तो सर्वस्व ओतून केला पाहिजे, तिथे तडजोड नाही. त्याप्रमाणे मी काम केले. महेश सरांबरोबर काम करण्याचा अनुभव सर्वस्वी आगळा वेगळा होता. खूप मजा आली. माझे सर्वोत्तम सिन्स त्यांच्याबरोबर झाले आहेत.”
डेन्टीस्ट्री शिकत असताना तिने सोबतीला अनुपम खेर अकादमीतून अभिनयाचे धडे घेतले. एक वर्षाचा कालावधी घेऊन ती कलाक्षेत्रात यायचं असं तिने ठरवलं. आजोबा चित्रपट निर्माते असल्याने तिला लहानपणापासून या क्षेत्राची ओळख होती. आजोबांकडे जायची तेव्हा फिल्मफेअर, दादासाहेब फाळके अवॉर्ड पाहून तिला वेगळे वाटायचे. त्यांच्यासोबत ती आपण या पुरस्कारांसाठी धन्यवाद देणारे भाषण करतोय अशी स्वप्ने ती रंगवायची. समाजकारण आणि राजकारणाचा घरचा वारसा असताना आपली मुलगी अभिनयात कारकीर्द करत आहे, हा घरच्यांसाठी मात्र एक धक्का होता.
“त्यांना कन्विन्स करायला वेळ लागला. पण आजोबा आणि वडील त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. आज दुर्दैवाने माझा चित्रपट पाहण्यासाठी माझे दोन्ही आजोबा, भाऊ व डॅडी हयात नाहीत, पण त्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत", सुरभीने सांगितले.
समाजकारण आणि राजकारण ती निश्चित प्राधान्याने पुढे सुरू ठेवणार आहे, पण त्याचवेळी आपले आराध्य दैवत असलेले छ. शिवाजी महाराजां जीवनावरील एखादा चित्रपट आला तर त्यात भूमिका करायची तिची इच्छा आहे. “एक राधा एक मीरा"हा एक संपूर्ण कुटुंबाने पाहावा असा "फील गुड" चित्रपट आहे आणि तो पाहताना प्रत्येकालाच खूप मजा येईल, असेही तिने म्हटले आहे.
अत्यंत ग्लॅमरस आणि हटके अशा या चित्रपटात सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा, शाल्मली खोलगाडे, सुखविंदर सिंग यांसारख्या दिग्गज गायकांच्या फौजेने चित्रपटाचे पार्श्वगायन केले आहे. सध्याचा आघाडीचा गायक विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे. आहालेज प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट स्लॉव्हेनीया, इटली, स्वित्झर्लंड येथे चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....